कर आरोप, घे राजीनामा हे महाराष्ट्रासाठी घातक!: उद्धव ठाकरे

सामना प्रतिनिधी । मुंबई

कर आरोप, घे राजीनामा, असा पायंडा राज्याच्या राजकारणात आणि सत्ताकारणात पडला तर तो महाराष्ट्रासाठी घातक ठरू शकतो, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. रंगशारदातील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, चोर तो चोर, वर शिरजोर अशी विरोधकांची अवस्था झाली असून जे आरोप करीत आहेत ते स्वतःच भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. त्यांची पापे झाकण्यासाठीच त्यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप सुरू आहेत.

राजकारणाची पातळी प्रचंड घसरली असून काँग्रेस-राष्ट्रवादीतील घोटाळेबाजांवर आधी कारवाई होणे गरजेचे आहे असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या अधिवेशनातही विरोधकांनी आरोपांचा चिखल उडवला होता. आताच्या अधिवेशनातही त्यांनी तेच केले. याच विरोधकांवर सिंचन घोटाळा, कोळसा घोटाळा, आदर्श घोटाळा, बँकांची कर्ज बुडवण्याची प्रकरणे असे अनेक आरोप आहेत. त्यांना आपल्या या कृत्याची लाजही वाटत नाही. हे अत्यंत भयानक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना देसाईंच्या पाठीशी ठाम

शिवसेना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, एक शिवसैनिक म्हणून मी पदाला चिकटून राहणारा नाही. मंत्री म्हणून चौकशीवर माझा दबाव येणार असल्याचे कोणाला वाटत असेल तर राजीनामा देऊन मोकळा होतो असे देसाई यांनी मला सांगितले होते. राजीनामा घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे गेलेही, पण मुख्यमंत्र्यांनी तो फेटाळला, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.