पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या तोंडालाही बूच लावा!

पुणे – ‘सामना’वर बंदी म्हणजे दुसरी आणीबाणी नाही तर आणखी काय? सामना छापायला बंदी घालायची आणि तुमचे पंतप्रधान, मुख्यमंत्री हे आचारसंहिता लागू असताना बोंबलत फिरणार. आधी त्यांच्या तोंडाला बूच लावा, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मोदी लाटेचा समाचार घेताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मोदी लाट जरूर होती. तिची हवा विधानसभा निवडणुकांमध्ये निघून गेली, आता फक्त विल्हेवाट सुरू आहे. भाजपचा उधळलेला अश्वमेध महाराष्ट्रात शिवसेनेने रोखला. सध्या कोणाचे सेटिंग कोणाशी आहे हे कळत नाही, पण शिवसेनेचे सेटिंग जनता जनार्दनाशी असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

महापालिका निवडणुकीतील झंझावाती सभांचे एकापाठोपाठ एक मैदान मारून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तुफान आज पुण्यात धडकले. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावरील या सभेला खच्चून गर्दी झाली होती. शिवसैनिकांच्या झुंडीच्या झुंडी भगवा डौलाने फडकवत येत होत्या. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ या जल्लोषी थाटात येणाऱया शिवसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सध्या कोणाचं कोणाशी सेटिंग आहे हेच कळत नाही. शिवसेनेचेदेखील सेटिंग आहे ते या महाराष्ट्रातील जनताजनार्दनाशी. निवडणुकीत सट्टा लावून आणि सेटिंग करून शिवसैनिक कधीही लढाईला जात नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत लाट जरूर होती पण ती मोदींची होती की काँग्रेस नकोची होती? विधानसभा निवडणुकीमध्ये लाट संपली. महाराष्ट्रात भाजपचा अश्वमेध शिवसेनेने रोखला. दिल्लीत निवडणूक झाली. भाजपला ३ जागा मिळाल्या. बिहारमध्ये मोदी गेले तेथे विशेष पॅकेज देऊ म्हणाले पण तेथे नितीश-लालूंचे सरकार आले. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस संपवून टाकू अशी भाषा केली. तेथे ममता बॅनर्जी जिंकल्या. तामीळनाडूत जयललितांची सत्ता आली. मग भाजपची लाट राहिली कुठे? लाट गेली, आता विल्हेवाट सुरू आहे.

पुण्यात भगवा फडकू द्या!

आज तुम्ही जागावाटपावरून युती तोडायला निघालात. म्हणूनच पुणेकरांना म्हणतो, ही मनपा शिवसेनेच्या ताब्यात द्या. पुण्यावर भगवा फडकू द्या. पुण्यातही विकासकामे करून दाखवतो. महापालिकेच्या शाळांतील मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करून त्यांना टॅब देतो. व्हर्च्युअल सिस्टीमचे शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच सभेत टाळय़ांचा कडकडाट झाला.

महिलांनो, बेधडक मसाल्याचे डबे उघडा!

नोटाबंदी करून सरकारने सर्वसामान्य जनतेला रांगेत उभे केले. आता ते महिलांच्या बचतीवर लक्ष ठेवून आहेत. महिला भगिनी कष्टाचा पैसा वाचवतात. घरात तांदळाच्या डब्यात पैसे ठेवतात. नोटाबंदीनंतर मलाही हे गुपित कळले असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच सभेत हशा पिकला. ते म्हणाले, आता हे हे तुमचे डबे पण बघणार आहेत. तेव्हा त्यांच्या तोंडावर बेधडक मसाल्याचे डबे उघडा असे म्हणताच महिलांनी उद्धव ठाकरे यांना हात उंचावून दुजोरा दिला.

पवार नक्की कोण? महामेरू की पद्मविभूषण?

शरद पवार नक्की आहेत तरी कोण ? पवार म्हणतात, मुंबईत शिवसेना नंबर एकवर राहणार. आता एवढे चांगले बोललेल्या माणसाबाबत वाईट कसं बोलायचं. त्यामुळे वाईट बोलणार नाही पण सत्य बोलतो. शरद पवार नक्की आहेत तरी कोण ? भ्रष्टाचाराचे महामेरू की पद्मविभूषण अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केली.

संघाने मेहनत केली नसती तर…

आम्हाला परिवर्तन करायचंय असं म्हणत आज जे भाजपवाले जॅकेट घालून मिरविताहेत त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या विचारातून भाजप उभे केले ते तुम्ही विसरलात. त्यांनी काम केलं म्हणून तुम्ही आहात. खरंच त्या विचारांचे परिवर्तन करायला निघालात. ‘आम्ही मेहनत नसती केली तर खुर्ची मिळाली नसती हे संघाने भाजपला ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. संतापाने पेटून उठले पाहिजे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी करताच सभेत जोरदार भाजपविरोधी नारा देण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिवसेनेला पाठिंबा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा घोषित केले. राज्य प्रवक्ते योगेश पांडे यांनी उद्धव ठाकरे यांना व्यासपीठावर भेटून तसे पत्र दिले. पांडे म्हणाले, शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे शेतकऱयांच्या प्रश्नासाठी लढत आहेत. व्यापाऱयांना मते देऊ नका, शिवसेनेला मत द्या असे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी भाषणात तुम्ही लाचारी न पत्करता स्वाभिमानाने सोबत आला अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धन्यवाद दिले.

सामना शस्त्र होऊन वार करेल

भाजपने निवडणूक आयोगाकडे ‘सामना छापायला बंदी घाला अशी तक्रार केल्याचे मला समजलं. म्हणे 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला ‘सामना’ छापायला बंदी करा. ही आणीबाणी नाही तर दुसरे काय आहे? अरे, आणीबाणी आणली म्हणून इंदिरा गांधींवर तुम्ही कोणत्या तोंडाने टीका करता. लढाई करायची तर खुल्या मैदानात करा. बंदी घालाल तर ‘सामना’ शस्त्र्ा होऊन वार केल्याशिवाय राहणार नाही. या ना एका मंचावर. होऊ जाऊ द्या फैसला असे जाहीर आव्हान देत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सामना’वर बंदी आणणार, तुमचा पंतप्रधान, मुख्यमंत्री बोंबलत फिरणार. त्यांच्या बोलण्यावर कुणाचं बंधन नाही. हे असं का? निवडणुका संपेपर्यंत त्यांच्या तोंडालाही बूच लावायला हवं. ही आमची मागणी आहे असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढविला.

बापट फिल्म पाहण्यात बिझी असतील …

भूखंड, चिक्की कोणी खाल्ली हे कळेल आणि डाळ कशी खायची हे शोभाताईंना विचारा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच उपस्थितांनी ‘बापट’ असा पुकारा केला तेव्हा ते म्हणाले, बापट बिझी असतील. ते कोणती तरी फिल्मबिल्म बघत असतील. त्यामुळे मी त्यांना फोन करायच्या भानगडीत पडत नाही असे सांगताच सभेत हशा उसळला. त्यावर चांगल्या संतमहात्म्यांच्याही फिल्म असू शकतील असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच पारदर्शकतेच्या शपथीचा पटकन वापर कसा होतो हे बापटांकडून शिकावे. शपथ घेतली आणि बापट सत्य बोलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात 65 हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्याची कबुली बापटांनी दिली, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

बीजेपीपेक्षा इंग्रजांची गुलामगिरी काय वाईट?

शेतकरी, जवान, पोलीस, महापालिका कर्मचारी सर्वांचे हाल सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या ‘पसिने की कमाई’ ना बँकेत भरता येत, ना काढता येत. आपला पैसा बँकेत भरताना चोरांसारखे आपल्याच प्रश्न विचारले जातात. सर्वसामान्यांना रांगेत उभे राहावे लागते. महिलांच्या बचतीवरही यांचा डोळा. पाकिस्तानाला धडा शिकवण्याची भाषा करणारे आपल्याच लोकांच्या मागे दांडू घेऊन लागले आहेत. गुंडांना हाताशी घेऊन पुढे जाणाऱया पक्षाबरोबर जाता येणार नाही. त्यामुळे बीजेपीपेक्षा इंग्रजांची गुलामगिरी काय वाईट? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.