‘जीएसटी’ कपात हा जनतेचा विजय; सरकारचेही अभिनंदन!

सामना प्रतिनिधी । मुंबई

केंद्र सरकारला अखेर जीएसटी कपात करावीच लागली, पण कपात करताना हे ‘दिवाळी गिफ्ट’ असल्याचा डंका पिटला जातो आहे. हे दिवाळी गिफ्ट नसून सरकारचा नाइलाज आहे. सरकारला जनतेच्या असंतोषापुढे झुकावे लागले आहे आणि हा जनतेचा विजय आहे. म्हणूनच जनतेचे आणि कपातीबद्दल सरकारचेही अभिनंदन, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. जनतेने आपल्यातील आग आणि जाग कायम ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. प्रचंड जनक्षोभामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी ‘जीएसटी’ कपातीचा निर्णय जाहीर केला. ‘सर्वसामान्य जनता एकवटली की सत्ताधारी कितीही मस्तवाल असला तरी जनता त्याला झुकवतेच’ असा खणखणीत टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित होते.

जनतेच्या असंतोषाचे रूपांतर उद्रेकात होऊ देऊ नका
केंद्र सरकारने तातडीने निवेदन करीत जीएसटीत कपात केल्याचे सांगितले. जनतेला किती लुटणार, कर किती लावणार. सरकारने दिवाळीची भेट दिली असं चित्र निर्माण केलं जातंय. म्हणजे या दिवाळीत मी तुम्हाला छळणार नाही, हीसुद्धा आपल्याला भेट वाटू लागलीय. सरकारने दिलेला हा दिलासा नाही. सरकारने केलेल्या या घोषणेचं श्रेय जनतेचं आहे. अवघा देश अस्वस्थ आहे. म्हणूनच जनतेच्या या अस्वस्थपणाचं रूपांतर असंतोषात आणि असंतोषाचं रूपांतर उद्रेकात होऊ देऊ नका, असे उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला बजावले.

२०१९ ची तयारी करता, मग कोळशाचे नियोजन का केले नाही!
अंसतोषाच्या झळांतूनही अजूनही जनता सावरलेली नाही. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेत तर दुसरीकडे लोडशेडिंगही सुरू आहे. लोडशेडिंग ‘तात्पुरते’ मागे घेत असल्याची राज्य सरकारने घोषणा केली, पण असले शब्दांचे खेळ आता करू नका. केंद्रात आणि राज्यात तुमचेच सरकार आहे. मंत्रीही तुमचेच आहेत. मग कोळशाचा तुटवडा कशासाठी? २०१९च्या निवडणुकांची तयारी करता, मग कोळशासाठीच्या उपाययोजना आधीपासून का केल्या नाहीत, असा परखड सवाल करतानाच लोडशेडिंग तातडीने रद्द करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

त्यांच्या जीवनमरणाचे प्रश्न त्यांनी सोडवावेत
नारायण राणे यांच्या पक्षाबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ‘कुणाच्या व्यक्तिगत जीवनमरणाच्या प्रश्नासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यांच्या जीवनमरणाचे प्रश्न त्यांनी सोडवावेत. ही परिषद गोरगरीब जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नाशी संबंधित आहे,’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविकांचा प्रश्न, रेल्वे पुलावरील फेरीवाले हटविण्यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला
मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी जे तीन विषय मांडले होते त्या विषयांवर तोडगा काढल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला धन्यवाद दिले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेल्या मागणीनुसार सरकारने अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ केली. त्यांच्या संपावर योग्य तोडगा निघाला. रेल्वे स्थानक आणि पुलावरील फेरीवाल्यांना हटविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे प्रशासनाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. रेल्वेनेही परिपत्रक काढून फेरीवाले हटविण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नावरही मार्ग काढण्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. म्हणूनच राज्य सरकारचे कौतुक करत त्यांचे आभार मानतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्वसामान्यांची लक्ष्मी ओरबाडलेय, दिवाळी कशी करणार!
उद्धव ठाकरे म्हणाले, सगळ्य़ा सणांची रयाच गेली आहे. ती कशामुळे हे सर्वांना ठाऊक आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन कसे करणार, असा प्रश्न जनतेला पडला आहे. कारण सरकारने सर्वसामान्यांची लक्ष्मीच ओरबाडून नेली आहे. दिवाळी साजरी कशी करणार? करावर कर लादले जात आहेत, जनतेचे शोषण सुरू आहे. हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या जनतेला राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोन पाहुणे आपल्या शेजारी बसून जेवताहेत की काय असा भास जनतेला होतोय, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या जीएसटीची पिसे काढली.

जीएसटी कपातीबद्दल अभिनंदन, पण गोळा केलेला कर परत देणार काय?
हे जनतेचे यश आहे. जनतेच्या असंतोषामुळेच सरकारला ‘करवापसी’ करावी लागली. व्यापाऱ्यांनीही एकजुटीने विरोध करून सरकारला झुकवले. ही एकजूटच महत्त्वाची आहे. ही दिवाळीची भेट नाही, तर या दिवाळीत मी तुम्हाला त्रास देणार नाही, असा त्याचा अर्थ आहे आणि हीसुद्धा आपल्याला भेट वाटू लागली आहे.

तटकरेंच्या पुस्तक प्रदर्शनात त्यांच्यावरील आरोप खोटे होते जाहीर करा!
सुनील तटकरे यांच्या पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रकाशन करणार आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, आपण पाणी शिंपडले की सर्व शुद्ध होते असा त्यांचा समज आहे. मग मुख्यमंत्र्यांनीच आपण केलेले आरोप खोटे होते हे भाषणात जाहीर करावे.