माझ्या देशाचे हित हा माझा स्वार्थ आहे! उद्धव ठाकरेंच्या फटकेबाजीने टीकाकरांची तोंडे बंद

केंद्रातील मोदी सरकारच्या हुकूमशाही राजवटीविरोधात देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत भाजपपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. लोकसभेची सेमीफायनल मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी दिल्लीत पार पडत आहे. या बैठकीसाठी दिल्लीत पोहोचलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. मी स्वार्थी आहे कारण माझ्या देशाचे हित हा माझा स्वार्थ आहे, अशा शब्दात त्यांनी टीकाकारांची तोंडे बंद केली.

भाजप नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत बोलताना सगळे स्वार्थी लोकं जमल्याची टीका केली होती. या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘माझ्या देशाचे हित हा माझा स्वार्थ आहे, देशातील लोकशाही हा माझा स्वार्थ आहे.’ इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, इंडिया आघाडीला समन्वयक, निमंत्रक यासाठी कोणी चेहरा ठरवता येतो का याबाबत आज-उद्या विचार करावा लागेल. आमच्या कोणाच्याही डोक्यात नेतृत्वाची हवा भरलेली नाही, आम्हाला देश वाचवायचा आहे. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही इंडिया म्हणून एकत्र आलो आहोत.

हुडी, गॉगल घालून मी भेटत नाही

दिल्लीत कोणाकोणाची भेट घेणार असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, संध्याकाळपर्यंत कोणाला भेटलो ते सांगेन. थंडी असली तरी मला हुडी, गॉगल घालून कोणाला भेटण्याची गरज नाही. मै जो करता हूं खुलेआम करता हूं. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या गद्दारीपूर्वी त्यांच्यात आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये गुप्त बैठका होत होत्या आणि त्यासाठी फडणवीस हे हुडी आणि गॉगल घालून बाहेर पडायचे असा खुलासा अमृता फडणवीस यांनी केला होता. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला.

मी हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यातला नाही, मुख्यमंत्री पदही मी एका जबाबदारीतून स्वीकारलं होतं. ते पद मी एका क्षणात सोडून दिलं होतं. त्यामुळे मी कोणतीही वेडीवाकडी स्वप्ने पाहात नाही. भ्रमात राहणारे असू तर आम्ही देशाचे शासनकर्ते म्हणून नालायक ठरू असे म्हणताना उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीमध्ये सध्या जे पक्ष आहेत त्यांनी मजबुतीने एकत्र राहण्याची गरज व्यक्त केली.

बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव, विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असून अवघ्या देशाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

भाजप विरोधात देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ या नावाने एकत्र येत ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया!’ असा बुलंद नारा देत आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार केला आहे. पाटणा, बंगळुरू, मुंबईनंतर दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये होणारी बैठक आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या बैठकीत सद्य राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा होऊन भविष्यातील धोरणे आणि कार्यक्रम ठरवला जाणार आहे. यामुळे ही बैठक भाजप विरोधातील सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी दिशादर्शक ठरणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. त्यामुळे या बैठकीत भाजपला घेरण्याच्या रणनीतीबरोबर ‘इंडिया’ आघाडीचा समान किमान कार्यक्रम आणि लोकसभेच्या जागावाटपावर प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.