मुंबईचा महापौर शिवसेनेचाच, उद्धव ठाकरेंचा निर्धार

17

सामना ऑनलाईन। मुंबई

थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या मुंबई महापालिकेतील तैलचित्राचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आलं. यावेळेस बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की “मी आत्ता महापालिकेत आलो आहे, मार्चमध्ये पुन्हा येणार महापौर बसल्यानंतर,पुन्हा एकदा भगवा फडकल्यानंतर ”

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की या तैलचित्रासाठीची जागा योग्य पद्धतीने निवडण्यात आली आहे. महापौरांच्या आसनाच्या बरोबर समोर प्रबोधनकारांचे छायाचित्र लावण्यात आले आहे, जे सतत महापौरांना आठवण करून देत राहतील की “कारभार नीट कर माझं लक्ष आहे तुझ्यावर”

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या आणि जीवाला चटका लावून गेलेल्या घटनेचाही उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी कावळ्याला काढताना अग्निशमन दलाचे ३ जवान वीजेच्या तारेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यातल्या राजेंद्र भोजने या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटेनबाबात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की माणूस असो किंवा कावळा अग्निशमन दल आणि त्याचे जवान त्यांचा जीव वाचवण्यासाठी कुठेही कमी पडत नाहीत.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मित्र पक्ष भाजपाने विकासकामांसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच त्यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांचे पारदर्शक कारभाराबद्दल आभार मानले.

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अनुकूल परिस्थितीत समाजकार्य करणं सोपं असतं मात्र प्रतिकूल परिस्थितीत ही बाब अत्यंत कठीण असते. मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की प्रबोधनकारांचं तैलचित्र लावायला आम्हाला उशीर झाला. जे महत्व इतर समाजसुधारकांमध्ये मिळायला हवं होतं, तेवढं महत्व त्यांच्या प्रबोधनकारांच्या विचारांना आणि संघर्षाला देऊ शकलो नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. प्रबोधनकारांनी जो लढा सुरू केला त्याचा वारसा,परंपरा बाळासाहेबांनी पुढे नेली.याच विचार परंपरपेला उद्धव ठाकरे पुढे न्यायचं काम करत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले.अग्निशमन दलाचे जवान राजेंद्र भोजने यांच्याबाबत बोलत असताना ते म्हणाले की भोजने यांच्याप्रमाणे इतरांचा मृत्यू होऊ नये म्हणून कार्यप्रणाली निश्चित करण्याची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या