गणेशोत्सवातून लोकमान्यांना हटवणं म्हणजे निर्लज्जपणाच! उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली

सामना प्रतिनिधी । मुंबई

गणेशोत्सव म्हटला की लोकमान्य टिळकांची आठवण यायलाच हवी. पण पुण्यातून ज्या बातम्या येताहेत त्या अत्यंत संतापजनक आहेत. गणेशोत्सवाच्या लोगोतून लोकमान्यांना हटवण्याचा कोडगेपणा आणि निर्लज्जपणा पुण्यात सुरू आहे. ज्या लोकमान्यांनी या उत्सवाची चळवळ केली त्यांनाच आपण विसरलो तर कपाळकरंटे ठरू, अशी तोफ आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डागली.

‘वंदे मातरम्’चा कायदा करा!

इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, अशी मोठी घोषणा झाली. पण ठामपणे कुणीच काही बोलत नाही. अगदी विधानसभेतसुद्धा ही घोषणा देण्यात आली. काय झाले? देशातून हाकललं तरी चालेल पण वंदे मातरम् म्हणणार नाही, असे अबू आझमी नाकावर टिच्चून म्हणाला. काय केलं आपण. फक्त थयथयाट. हे देशभक्तीचं प्रेम थोतांड असता कामा नये, वंदे मातरम्साठी कायदाच करा, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

साप्ताहिक मार्मिकचा 57वा वर्धापन दिन विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृह येथे उत्साहात साजरा झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिकेचे वाभाडेच काढले. सार्वजनिक गणेशोत्सवाचे 125वे वर्ष साजरे करताना पुणे महापालिकेने कार्यक्रमाच्या लोगोमध्ये लोकमान्य टिळकांना स्थानच दिले नाही.

याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, लोकमान्य टिळकांचा चेहरा झाकण्याचं धाडस होतेच कसे. धाडस करणारे कोण तर ही आपलेच लोक ज्यांना आपण निवडून दिलं. त्यांच्याकडून आपल्या वेगळ्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा तर दूरच राहिल्या. पण त्यांच्याकडूनच हा कपाळकरंटेपणा होतोय़
कुंचल्याच्या रेषांनी मराठी माणसाला न्याय मिळवून दिला
स्वाभिमान हरवून बसलेल्या मराठी माणसाच्या मनात मार्मिकने स्वाभिमानाची ठिणगी टाकली. सर्वसामान्यांच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण असावेत म्हणून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे काका श्रीकांत ठाकरे यांनी हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, ज्योतिषांवर विश्वास ठेवू नका! पण हातातील रेषांवर विश्वास न ठेवणाऱया शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्याच्या रेषांनी मराठी माणसाला न्याय मिळवून दिला. त्यांच्यातील आत्मविश्वास जागवला. हे सोहळे केवळ वर्षे किती झाले हे मोजण्यासाठी नाहीत तर भविष्य उजळवण्यासाठी आहेत, असा आपुलकीचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.

वंदे मातरम् रोजच म्हणायला हवे

15 ऑगस्ट, 26 जानेवारी आले की आपल्याकडे देशप्रेमाला भरतं येतं. महापालिकेच्या शाळांमध्ये आठवडय़ात दोन दिवस वंदे मातरम् म्हणण्याबाबत मला विचारण्यात आलं. फक्त एक किंवा दोन दिवस कशासाठी? वंदे मातरम् रोजच म्हणायला हवं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

त्या भाजपच्या मंत्र्यांना देशाबाहेर घालवणार का?
भाजपचे मंत्रीसुद्धा म्हणताहेत की, वंदे मातरममधून देशभक्तीचं मोजमाप घेता येणार नाही. भाजपवाल्यांना मला विचारायचंय, तुमचेच मंत्री जे म्हणताहेत त्यांना देशाबाहेर घालवायचं का, असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

झेंडा फडकवणार असाल तर राष्ट्रगीत म्हणावंच लागेल
वंदे मातरमवरून वाद कसला करता? उत्तर प्रदेशमध्ये मदरशांत येत्या 15 ऑगस्टला देशभभक्तीची परीक्षा घेतली जाणार आहे. योगींनी फतवाच काढलाय, काय काय करायचं ते. मग तिथल्या आणखी एका संघटनेने फतवा काढला, झेंडावंदन करू पण राष्ट्रगीत म्हणणार नाही. हिंदुस्थानचं राष्ट्रगीत म्हणणार नसाल तर तुम्ही कोणत्या देशाचा झेंडा फडकवणार? जर आमच्या देशाचा झेंडा फडकवणार असाल तर आमच्या देशाचं राष्ट्रगीत म्हणावंच लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

शिवसेना, मार्मिक आणि सामना हे त्रिशूळ

शिवसेना, मार्मिक आणि दैनिक सामना हे त्रिशूळ असून ते आपल्यासोबत आहे. त्यामुळे कोणीही आडवा आला तरी घाबरायची गरज नाही, आपल्यासोबत असलेल्या त्रिशूळानेच त्याचा संहार करून पुढे जा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

दीपस्तंभ मार्ग दाखवत नसेल, पण समुद्रातील
खडक दाखवतो!

अजून खूप काम बाकी आहे. एक पिढी गेल्यानंतर नवीन पिढी येते. मला वाटतं, आता मार्ग दाखवणाऱयाची खूप गरज आहे. एखाद्याचं कौतुक करताना आपण म्हणतो की, यांचं जीवन दीपस्तंभासारखं आहे. दीपस्तंभ मार्ग दाखवतो की नाही मला माहीत नाही. पण तो रात्रीच्या वेळी समुद्रातील खडक दाखवतो, धोके दाखवतो. तुमचे जहाज दुरून न्या,नाहीतर कपाळमोक्ष होईल, असे सांगतो. हे धोके दाखवताना जर कुणाला वाटलं, हा माझा विरोधी आहे तर माझा नाइलाज आहे. तुमचा जरी विरोधी असलो तरी मी जनतेचा हितचिंतक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मार्मिकच्या बदलासाठी कमरेला शेला बांधून तयार – पंढरीनाथ सावंत

मार्मिकमध्ये 57 वर्षांपूर्वी मी कामाला सुरुवात केली. त्याच्या आदल्या दिवसापर्यंत मी बस कंडक्टर होतो. मार्मिकनेच मला पूर्णवेळ पत्रकार बनवले, असे मत मार्मिकचे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांनी व्यक्त केले. तसेच बदलत्या काळानुसार मार्मिकही लवकरच बदलणार आहे. या नव्या बदलासाठी मी 84व्या वर्षीही कमरेला शेला बांधून तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशी, ऍड. लीलाधर डाके, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, खासदार गजानन कीर्तीकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपनेते भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब उपस्थित होते. शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.