‘रमाधाम’मधील आजी-आजोबांवर मायेची पाखर, उद्धव ठाकरे यांनी केली विचारपूस

251

सामना ऑनलाईन । खालापूर

निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या रमाधाम वृद्धाश्रमास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी भेट देऊन तेथील आजी-आजोबांवर मायेची पाखर घातली. त्यांची आस्थेने विचारपूस करत त्यांना काय हवे, नको याबाबत जाणून घेतले. या आपुलकीने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या पापण्या ओलावल्या, तर आजी-आजोबांनी उद्धव ठाकरे यांना यशस्वी भव… असा आशीर्वाद दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘रमाधाम’ला भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची माहिती करून घेतली. तसेच रमाधामची पाहणी केली. त्याच भागात तीन मजली नवी इमारत उभी राहत असून त्याचीही त्यांनी माहिती घेतली. ध्यानधारणेसाठी आम्हाला एखादे मंदिर बांधून द्या, अशी विनंती वृद्धांनी केली. ती उद्धव ठाकरे यांनी तत्काळ मान्य केली. यावेळी शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, पुण्याचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, अभिनेते मिलिंद गुणाजी, रामनाथ कर, लोकाधिकार महासंघाचे वामन भोसले, उल्हास बिले आदी उपस्थित होते.

शिवसेना अशीच बहरू दे…
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार विजयी झाल्याबद्दल रमाधाममधील वृद्धांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला. तसेच शिवसेना अशीच बहरू दे.. आयुष्यमान भव… असा आशीर्वादही दिला. तुमच्या प्रयत्नांमुळे अयोध्येत राममंदिर निश्चित होईल, असा विश्वासही आजी-आजोबांनी व्यक्त केला

आपली प्रतिक्रिया द्या