रामजन्मभूमीत घुमला ‘जय श्रीराम’चा नारा! उद्धव ठाकरे यांनी घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन

3
uddhav-thackeray-ayodhya-rammandir

विशेष प्रतिनिधी, अयोध्या

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी रामजन्मभूमीत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले आणि श्रीरामजन्मभूमी पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेली. यावेळी सौ. रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा त्यांच्यासोबत होते.

‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ अशी गर्जना करीत उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्येत दाखल झाले. शनिवारी लक्ष्मण किला येथील आशीर्वादोत्सव आणि सायंकाळी शरयू नदीची महाआरती असा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब रामजन्मभूमीचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱयामुळे केवळ अयोध्येतच नव्हे तर अवघ्या देशभरात पुन्हा एकदा हिंदुत्वाचा, राममंदिराचा जागर होऊ लागला आहे हेच खरे!
सकाळी नऊच्या सुमारास उद्धव ठाकरे यांचे रामजन्मभूमीत आगमन होताच ‘जय श्रीराम’, ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी आसमंत निनादला. श्रीराम जन्मभूमीचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे, अनिल देसाई, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

कडेकोट बंदोबस्त
उद्धव ठाकरे यांच्या नियोजिन रामजन्मभूमी दर्शन दौऱयासाठी आज अयोध्या शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील मुख्य मार्ग चारचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. जागोजागी बंदूकधारी पोलिसांचा खडा पहारा होता.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले आहे. शिवसेना आणि भाजपचा हिंदुत्व हा एकमेव उद्देश असल्याने उद्धव ठाकरेंनी अयोध्येला जाणं चांगलंच आहे. राम मंदिर उभारणे हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं अयोध्येला जाणं हे युतीसाठी पोषक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे अयोध्येला गेले याचा आम्हाला आनंद आहे. राम मंदिर हा राजकीय विषय नाही. राम मंदिर झालं पाहिजे हे सर्व हिंदू बांधवांना वाटते. प्रभू श्रीराम अवघ्या हिंदुस्थानचे अराध्या दैवत आहेत. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्याने त्यांना प्रभू श्रीराम नक्कीच आशीर्वाद देतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.