जनतेच्या रेटय़ापुढे हुकूमशहा टिकणार नाही, उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

‘जनता हा देशातील एक मोठा घटक आहे. नेते नव्हे, तर जनताच क्रांती करते. भाजपने चंदिगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेसाठी जनतेच्या मनाविरुद्ध कारस्थाने केली; पण तोडा, फोडा, झोडा, तुरुंगात टाका हे आता जास्त दिवस टिकणार नाही,’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांनी आपल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेचा समारोप केल्यानंतर आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतानाही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून हल्ला केला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुषमा अंधारे यांच्या यात्रेचेही काwतुक केले. असहाय्य लोकांच्या सहनशीलतेचा अंत होण्यापूर्वी त्यांना धीर दिलात, आपल्यासाठी लढणारे कुणीतही आहे असा विश्वास दिलात त्याबद्दल धन्यवाद, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अशा संवाद यात्रा आणि जनतेच्या रेटय़ासमोर कोणताही मोठा हुकूमशहा टिकणार नाही, असेही ते म्हणाले.

भाई और बहनों, सुषमाताई को घर दिया की नही दिया!

गेल्या महिनाभरापासून सुषमा अंधारे दौऱयावर होत्या. विविध जिह्यांमधील सर्वसामान्यांशी संवाद साधून अंधारेंनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या दौऱयादरम्यान आपण आपला मुक्काम तंबू, झोपडय़ांमध्ये असायचा, अशी माहिती अंधारे यांनी दिली. त्यावर ज्या झोपडय़ांमध्ये राहिलात त्या नंतर काढल्यात ना? नाहीतर आता भलतीच माणसे तिथे राहायला यायची आणि कब्जा करायची, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तुमचा मुक्काम असलेल्या झोपडय़ांचे पह्टो पंतप्रधान मोदी पंतप्रधान आवास योजनेच्या जाहिरातीत वापरायचे आणि देखो भाई और बहनों, सुषमाताई को घर दिया की नही दिया असा प्रश्न भाषणातून विचारायचे, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला.

लोकांचा पोलीस आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडत चाललाय

सुषमा अंधारे यांनी आपल्या यात्रेवेळी आलेले अनुभव या वेळी सांगितले. 13 लोकसभा व 34 विधानसभा मतदारसंघ आणि 1100 गावांमध्ये या यात्रेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला गेला. 8 ते 10 लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलो असे अंधारे म्हणाल्या. या यात्रेदरम्यान लोणार, वाशीम, हिंगोली, परभणी, बीड, शिर्डी, नगर, भिवंडी, कल्याण आदी भागांमध्ये शेतकरी, कांदा उत्पादक, दूध विव्रेते, नागरिकांनी पीकविम्याचे पैसे न मिळणे, सोयाबीन व कापसाला भाव न मिळणे, बी-फार्मा करूनही नोकऱया न मिळणे, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी आदी समस्यांबाबत आपली गाऱहाणी मांडली. विद्यमान सरकारकडून काहीच मदत मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. ठाणे आणि कल्याणमधील वकिलांनी तर महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे हे कल्याणमध्ये नोंदले गेल्याची माहिती दिली. त्यामुळे लोकांचा पोलीस आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडत चालला असल्याचे त्यांचे म्हणणे असल्याचे अंधारे यांनी या वेळी सांगितले. याप्रसंगी महेश पाटील, जयेश वाणी, शंकर मिटकरी, बाळासाहेब शेख, अशोक जाधव, रत्नाकर शिंदे, राजेश विभुते, गोपाळ बशिरे, विनायक भिसे, रुपेश म्हात्रे आदी पदाधिकारी तसेच युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांच्या कामाबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांची प्रशंसा केली.