इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

हुकूमशाही पद्धतीने कारभार करणाऱया मोदी सरकारला 2024च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेतून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीने भक्कम वज्रमूठ आवळली असून इंडिया आघाडीची चौथी बैठक उद्या मंगळवारी राजधानी दिल्लीत होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

पाटणा, बंगळुरू आणि मुंबईनंतर आता दिल्लीत इंडिया आघाडीतील 28 पक्षांचे प्रमुख नेते एकत्र येत आहेत. दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये दुपारी तीन वाजता ही बैठक होणार असून आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांशी समन्वय साधून या बैठकीचे नियोजन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

– लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असावा, यावर बैठकीत विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता.

– देशभरात संयुक्त प्रचारसभा घेऊन भाजप आणि मोदी सरकारच्या कारभाराची चिरफाड करण्याची व्यूहरचना आखणार.

– पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही बैठकीत मंथन होईल.