उदगीरच्या विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू

सामना ऑनलाईन । लातूर

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या उदगीर येथील सुनील बालाजी बिरादार (वय २६) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी घडलेली ही घटना शुक्रवारी सकाळी सुनीलचे वडील बालाजी बिरादार यांना अमेरिकेतून फोन आल्यावर कळली.

सुनीलच्या वडीलांची उदगीर तालुक्यात हैबतपूर येथे शेती आहे. वडीलांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असून मुलांच्या शिक्षणासाठी ते उदगीर येथील शेतकी निवासजवळ घर करून राहतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. सुनील मेकॅनिकल इंजिनीअर असून त्याने पुण्यातील पुण्यातील सिंहगड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. आठवीपर्यंतचे शिक्षण लाल बहादूर शाळा उदगीर तर बारावीपर्यंतचे शिक्षण हैदराबाद येथून घेतले होते. ५ ऑगस्ट रोजी तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता.

सुनील त्याच्या मित्रांमुळे तणावामध्ये होता, तसे त्याने वडिलांना २७ ऑक्टोबर रोजी फोनवर बोलताना सांगितले होते. वडिलांनी सुनीलला मायदेशी परत येण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर थेट सुनीलच्या मृत्यूची बातमी आली आहे. सुनीलच्या घरच्यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रताप शिवशिवे यांच्यामार्फत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी संपर्क साधला आहे. निलंगेकर यांनी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून सुनीलचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी हिंदुस्थानात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.