2016 मध्ये केला होता पहिला ‘सर्जिकल स्ट्राइक’-लेफ्ट. जनरल रणबीर सिंह

455

सामना ऑनलाईन। उधमपूर

पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना वेचून ठार केले होते. बालाकोटचा हा सर्जिकल स्ट्राइक प्रशंसनीय आहेच, पण आम्हाला असे दणके नवीन नाहीत. सप्टेंबर 2016 मध्ये आम्ही पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राइक केला होता. हिंदुस्थानच्या सीमेजवळ येण्याचा प्रयत्नही करू नका, अशा शब्दात लष्कराचे नॉर्दन कमांडचे कमांडिंग इन चीफ लेफ्ट. जनरल रणबीर सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले.

लेफ्ट. जनरल सिंह पुढे म्हणाले की, हिंदुस्थानी लष्कराला कमी लेखू नका. मुळात सीमारेषेजवळ येण्याचाच प्रयत्न करू नका. कारण आमची रणनीती आता स्पष्ट आहे. पाकिस्तानकडून आता काहीही कारवाया झाल्या तर त्याचे आम्ही चोख उत्तर देऊ. आमची केवळ क्षमताच दणदणीत आहे असे नाही, तर आमची मानसिकताही आता चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानच्या कागाळ्या सुरूच

लेफ्ट. जनरल रणबीर सिंह म्हणाले की, पाकिस्तानने पुन्हा एकदा हिंदुस्थान विरोधी कारवाया सुरू केल्या आहेत. पण तरीही आम्ही जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था नियंत्रणात ठेवली आहे. दुसरीकडे जेथे चीनसोबत आमचा सीमारेषेवर सामना होतो, तेथेही आम्ही शांतता प्रस्थापित ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. तरीही पाकिस्तानच्या कागाळ्या अजून सुरूच आहेत, असे सांगून ते म्हणाले की, पाकिस्तान्यांकडून अजूनही घुसखोरी, युद्धबंदी करार मोडणे, अमली पदार्थांची तस्करी, बनावट नोटा, नारकोटिक्स वगैरे प्रकार सुरूच आहेत. पण याचा अर्थ ते हिंदुस्थानशी प्रत्यक्ष लढाई करू शकत नाहीत हाच घेता येतो. म्हणून ते लपून छपून व्यवहार करतात. पण त्यांचे हे मनसुबे आम्ही कधीच सफल होऊ देणार नाही याची खात्री देतो, असेही रणबीर सिंह यांनी सांगितले.

86 दहशतवादी संपवले

देशात लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. याचे श्रेय सरकार, प्रशासन आणि सुरक्षा दलांचे जवान यांना देत लेफ्ट. जनरल रणबीर सिंह म्हणाले की, लोकसभा निवडणुकीदरम्यान काहीच मोठी दुर्घटना घडली नाही. मतदार शांततेने आणि सुरक्षितपणे मतदान करू शकले. आता आम्ही फक्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या कामाला पुन्हा लागू शकतो. यातच काही सर्जिकल स्ट्राइक्सचाही समावेश आहे. या वर्षी आतापर्यंत आम्ही 86 दहशतवादी संपवले आहेत. पुढेही ते संपवण्याचा धडाका सुरूच राहील. आतापर्यंत आम्ही 20 फरारी दहशतवादी पकडले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या