‘आधार’ नाही म्हणून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारू नका, यूआयडीएआयने शाळांना बजावले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आधारकार्ड नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारू नका. तशी कारवाई अवैध ठरेल, असे आधार बनविणाऱया युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) देशातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना बजावले.

केवळ आधारकार्ड नाही म्हणून देशातील एकाही विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क नाकारला जाऊ नये असे आमचे धोरण आहे, असे स्पष्ट करून यूआयडीएआयने सांगितले, शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी विभागातील बँका, पोस्ट कार्यालये, राज्याचा शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधावा आणि आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत. अनेक शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांवर आधारकार्ड द्या अशी सक्ती करीत असल्याची प्रकरणे उघड झाल्यावर आधार प्रशासनाने पत्रक प्रसिद्ध करीत देशभरातील शाळांना वरील इशारा दिला आहे. सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांनाही हे पत्रक पाठविण्यात आले आहे.