पावसाचे धमाकेदार कमबॅक, उजनी धरण १०० टक्के भरलं

सामना ऑनलाईन । टेंभुर्णी

सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेलं उजनी धरण शंभर टक्के भरत आल्यामुळे मंगळवारी संध्याकाळपर्यंत उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. दुपारी १२ वाजल्यापासून उजनीतून पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असल्याची माहिती अधीक्षक अभियंता शिवाजीराव चौगले यांनी दिली असून उजनी धरणाची पाणी पातळी ९२.१५ टक्के झाली आहे.

उजनीतून दुपारी १२ वाजण्याचा सुमारास पाणी सोडण्यास सुरुवात झाली. भीमा सिना जोड कालव्यातून ८०० क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी १६०० क्युसेक्स तर उजनी कालव्यातून २५०० क्युसेक्स असे एकूण ५००० क्युसेक्स पाणी धरणातून सोडण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसाने उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील धरणे पूर्ण भरली आहेत. या जिल्ह्यातील आठ धारणातून दुपारी १२ वाजता ४० हजार ५१४ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. तर दौंड येथून ४२ हजार ८८४ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग उजनीत मिसळत आहे . धरण शंभर टक्के भरण्याच्या अवस्थेत असल्याने कुठल्याही क्षणी भिमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला असून पाण्याचा प्रवाह वाढल्यास अधिक विसर्ग भीमा नदीत सोडले जाणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता शिवाजीराव चौगुले यांनी दिली आहे.