जालियनवाला बाग हत्याकांडावर ब्रिटिश संसदेत ऐतिहासिक चर्चा होणार

सामना ऑनलाईन । लंडन

हिंदुस्थानमध्ये ब्रिटिश राजवटीत घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडावर ब्रिटिश संसदेतील वरिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ लार्ड्स मध्ये चर्चा होणार आहे. जालियनवाला बाग येथील हत्याकांडाला येत्या 13 मार्च रोजी 100 वर्षं पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी ही ऐतिहासिक चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये जवळपास 9 वक्ते भाग घेणार आहेत.

हिंदुस्थानच्या इतिहासातील काळे पान म्हणून ओळखले जाणारे जालियनवाला बाग हत्याकांड 13 मार्च 1919 रोजी घडले होते. या हत्याकांडाच्या शताब्दी निमित्त ब्रिटिश संसदेत या चर्चेचे आयोजन केले आहे. लॉर्ड मेघनाद देसाई आणि लॉर्ड राज लूंबा हे चर्चेच्या आयोजन समितीचे सदस्य आहेत. ब्रिटिश संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील मुख्य चेंबरमध्ये शंभर वर्षांत पहिल्यांदाच जालियनवाला बागेतील हत्याकांडावर सखोल चर्चा होणार आहे. या अगोदर जुलै 1920 साली चर्चा झाली होती त्यावेळी ब्रिगेडिअर जनरल डायरच्या कृत्याचा हाऊस ऑफ लार्ड्समध्ये निषेध व्यक्त केला होता. ब्रिगेडिअर जनरल डायर याने बंदुकधारी पोलिसांनी नि:शस्त्र जमावावर अंधाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात एक हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर त्याहून जास्त लोक जखमी झाले होते. या नरसंहाराबाबत लॉर्ड देसाई आणि लूंबा यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी पत्र लिहून माफी मागावी अशी मागणी केली आहे.