उल्हासनगर पालिकेचा चेंडू ९६ कोटींवरच अडला

1

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर

२०१७-१८ या आर्थिक वर्षातील शंभर टक्के टॅक्स वसुलीचे उल्हासनगर महापालिका प्रशासनाचे स्वप्न अखेर भंगले आहे. वसुलीचा चेंडू ९६ कोटींवर अडला असून विनाशकारी डीपीच्या दहशतीचे पडसाद तसेच जिन्स व्यवसाय मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे टार्गेट पूर्ण झालेले नाही. पुढील आर्थिक वर्षात तरी शंभर टक्के वसुली करण्यासाठी आयुक्तांनी वंâबर कसली असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या तिजोरीत ठणठणात असल्याने तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मालमत्ता करवसुलीवर अधिक जोर दिला आहे. त्यासाठी अभय योजनादेखील लागू केली. थकबाकी वसूल करण्यासाठी तसेच चालू आर्थिक वर्षाची ९२ कोटींची वसुली करण्याकरिता अधिकाऱ्यांना सांगितले होते. या वसुलीकरिता मालमत्ता कर विभागातील उपायुक्त दादा पाटील, करनिर्धारक व संकलक संतोष जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुखांना आयुक्तांनी वसुलीसाठी जुंपले होते.

सुरुवातीला टॅक्स वसुलीला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र शहराचा विनाशकारी डेव्हलपमेंट प्लँट वर्षाअखेरीस आला आणि सारे चित्रच पालटले. हजारो नागरिकांची घरे जाणार असल्याच्या भीतीने घबराट निर्माण झाली. त्याचा परिणाम वसुलीवर झाला. त्याशिवाय कायद्याच्या कचाट्यात जिन्स कारखाने सापडल्याने त्यांच्याकडून होणारी करवसुलीदेखील कमी झाली. यंदा विक्रमी ९६ टक्के एवढी वसुली झाली असली तरी शंभर टक्के वसुलीचे टार्गेट पूर्ण करता आलेले नाही. गेल्या वर्षी ८८ कोटींची वसुली झाली होती. आता पुढील आर्थिक वर्षात वसुलीवर अधिक भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.