लघुशंकेसाठी रुळावर जाणं महिलेच्या जीवावर बेतलं

फाईल फोटो

सामना ऑनलाईन । कल्याण

लघुशंकेसाठी रेल्वे रुळावर उतरलेल्या एका महिलेचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मंगळवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली. सीताबाई सोळंके असं या महिलेचं नाव असून त्या परभणीच्या रहिवासी होत्या.

सीताबाई त्यांच्या काही नातेवाईकांसोबत आपल्या मुलीच्या उपचारासाठी देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला आल्या होत्या. कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर त्यांची गाडी थांबली. त्यावेळी लघुशंकेला जाण्यासाठी डब्यातल्या प्रसाधनगगृहाजवळ आल्या. मात्र तिथे खूपच गर्दी असल्याने त्या गाडीतून खाली उतरल्या. त्यांना जवळपास दुसरं प्रसाधनगगृह न मिळाल्याने त्या लघुशंकेसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ४ च्या रेल्वे रुळावर गेल्या. त्याचवेळी बदलापूर लोकल कल्याण स्थानकात येत होती. त्यामुळे या लोकलने त्यांना धडक दिली. यामध्ये सीताबाईंचा मृत्यू झाला.

लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये सीताबाईं अडकून राहिल्यामुळे त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी काही वेळ लागला. सीताबाई यांच्या एका नातेवाईकांनी त्या उतरल्या तेथे आणि जवळ असलेल्या प्लॅटफॉर्मवर महिलांसाठी प्रसाधनगृह नसल्याचं सांगितलं आहे. मात्र याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारलं असता त्यांनी प्रसाधनगृह असल्याचं म्हटलं आहे. या घटनेचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला. रेल्वेने सुमारे तासभर खोळंबा झाल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याची उद्घोषणा सुरू केली. मात्र हा खोळंबा तांत्रिक बिघाडामुळे नाही तर अपघातामुळे झाल्याचं काही वेळाने स्पष्ट झालं. त्यावेळी रेल्वेने अशा खोट्या उद्घोषणा का केल्या, असा प्रश्न आता प्रवाशांनी उपस्थित केला आहे.