शवागारातील वातानुकुलित यंत्रणा फेल, दुर्गंधीचा कहर

1

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाणे सिव्हिल रुग्णालयातील शवागृहातील वातानुकुलित यंत्रणेत गेल्या दीड महिन्यापासून बिघाड झाल्यामुळे येथील मृतदेहांची अक्षरशः हेळसांड होत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. एक, दोन दिवस नव्हे तर आठवडाभर बेवारस मृतदेह शवागृहात तसेच पडून असल्याने दुर्गंधीने संपूर्ण रुग्णालयाला घेरले आहे. धक्कादायक म्हणजे येथील शवागृहात केवळ 12 मृतदेह ठेवण्याची क्षमता असतानाही सध्या 30 मृतदेह कोंबले असून त्यांना बर्फाच्या ढिगाऱ्यात ठेवले आहे.

ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या शवागृहात 12 मृतदेह ठेवण्याची क्षमता असतानाही कित्येक वेळा हा आकडा 45 पर्यंत जातो. उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा मृतदेह एक ते दोन दिवसांत नातेवाईक घेऊन जातात. मात्र खरी अडचण निर्माण होते ती बेवारस मृतदेहांची. रेल्वे अपघातासह विविध अपघातात जीव गमावलेले मृतदेह पोलीस सिव्हिल रुग्णालयातील शवागृहात ठेवतात. मृतदेहाचे नातेवाईक येईपर्यंत शवागृहातच बॉडी ठेवावी लागत असल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त कोंबाकोंबी होते. एकीकडे शवागृहाची क्षमता वाढवण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होत नसताना दुसरीकडे येथील वातानुकूलीत यंत्रणेत वारंवार बिघाड होत आहे. शवागृहाचे तापमान कमी ठेवण्यासाठी सध्या मृतदेहांभोवती बर्फाच्या लाद्या ठेवण्यात येत आहेत. मात्र तरीही मृतदेह कुजत आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या शवागृह परिसरात तर इतकी दुर्गंधी पसरली आहे की येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

दुरुस्तीसाठी अडचण
मृतदेहांमुळे शवागृहातील एसी दुरुस्त करण्यास अडचण येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. जोपर्यंत बेवारस मृतदेह येथून पोलीस हटवत नाहीत तोपर्यंत एसी दुरुस्ती करणे अशक्य असल्याची हतबलताही दर्शवली.

विल्हेवाटीसाठी पोलीस आयुक्तांना पत्र
ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातून ठाणे व पालघर जिह्यातील विविध भागांतील सुमारे 700 ते 800 रुग्ण तपासणीसाठी येतात. तसेच रेल्वे अपघातात दगावलेले पाच ते सहा मृतदेह सिव्हिल रुग्णालयात आणले जातात. या मृतदेहांचे नातेवाईक किंवा वारस सापडेपर्यंत त्यांना शवागृहातच ठेवावे लागते. मात्र या बेवारस मृतदेहांमुळे शवागृह हाऊसफुल्ल झाले असून रुग्णालय प्रशासनाने मृतदेह ठेवण्यास पोलिसांना नकार दिला आहे. तसेच या मृतदेहांची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्यासाठी सिव्हिल रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पकार यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र दिले आहे.