पोलीस आयुक्तालयासमोर कार सापडल्याने खळबळ

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई पोलीस आयुक्तासमोर पार्किंगमध्ये बुधवारी एक बेवारस कार सापडल्याने एकच खळबळ उडाली. ही कार गेल्या दहा दिवसांपासून पार्क करण्यात आली होती. दरम्यान, बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने केलेल्या झाडाझडतीमध्ये या कारमध्ये संशयास्पद काहीच सापडले नाही. मात्र ही कार कुणाची आणि त्याने येथे का सोडली याबाबत मात्र गूढ कायम आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाशेजारी क्रॉफर्ड मार्केटसमोर पार्किंग झोन आहेत. शुल्क भरून येथे गाडय़ा पार्क केल्या जातात. बुधवारी पार्किंग सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याने आझाद मैदान पोलिसांशी संपर्क साधला आणि या कारबाबत माहिती दिली. निळय़ा रंगाच्या शेर्वोलेट कारचा पोलिसांनी ताबा घेतला. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला पाचारण करून गाडीची झाडाझडती घेण्यात आली. गाडीमध्ये कपडे, भांडी आणि लॅपटॉप तसेच इतर वस्तू सापडल्याचे आझाद मैदान पोलिसांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कार बिहारची असून १८ डिसेंबर रोजी पार्क करण्यात आली होती. विशेष म्हणजे, कारचालक पार्क करताना येथील कर्मचाऱ्याला गाडीची चावी देऊन गेला. ही गाडी कुणाची आहे आणि तो इतके दिवस पार्क करून का गेला याचा शोध आझाद मैदान पोलीस घेत आहेत.