रस्त्यावर नाचणाऱ्या वऱ्हाडींच्या अंगावरून गेला भरधाव ट्रक! 13 जण मृत्युमुखी

accident-common-image

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थान येथील प्रतापगढ जिल्ह्यात सोमवारी रात्री एक भयंकर अपघात घडला आहे. रस्त्यावर नाचणाऱ्या वऱ्हाडींच्या अंगावरून भरधाव ट्रक गेल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण या घटनेत जखमी झाले आहेत.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, प्रतापगढ-जयपूर महामार्गावर अंबावली या गावानजीक मध्यरात्रीच्या सुमाराला 50हून अधिक वऱ्हाड्यांची वरात रस्यावरून जात होती. या दरम्यान तिथून भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक वरातीला धडकला. यामुळे 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण रुग्णालयात दगावले. उर्वरित 15 जखमींवर उपचार सुरू आहेत. हा अपघात झाल्यानंतर ट्रकचालक तिथून फरार झाला.

पोलिसांनी या अपघातातील बळींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत. पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.