१७ वर्षांखालील फिफा विश्व चषकाची जादू हिंदुस्थानात पसरतेय, माजी कर्णधार भूतियाचा विश्वास

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पुढच्या महिन्यामध्ये हिंदुस्थानात होणाऱ्या ‘अंडर १७ फिफा विश्व चषक’ फुटबॉल स्पर्धेची जादू अवघ्या हिंदुस्थानात पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा हिंदुस्थानात फुटबॉलला नक्कीच लोकप्रियता प्राप्त करून देईल, असा विश्वास हिंदुस्थानचा माजी कर्णधार बायचूंग भूतिया याने व्यक्त केला आहे.

६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत हिंदुस्थानमध्ये ‘अंडर १७ फिफा विश्व चषक’ स्पर्धा पार पाडणार असून हिंदुस्थानी फुटबॉलप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे, असे भूतिया म्हणाला.

१७ वर्षांखालील फिफा वर्ल्ड कप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने हिंदुस्थानामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. फुटबॉलच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येत असून स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानमध्ये फुटबॉलचे अनेक क्लब, अकादमी सुरू होत आहेत ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट असल्याचे मत भूतियाने व्यक्त केले.