हिंदुस्थानचा कसून सराव

सामना ऑनलाईन, गुरगाव

हिंदुस्थानात पहिल्यांदाच १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक स्तरावरील मानाच्या स्पर्धेत यजमान हिंदुस्थान संघ कात टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. मुख्य प्रशिक्षक लुईस नार्टोन डी मॅटोस यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानच्या युवा संघाने बुधवारी हरयाणा येथील कनसाईन्स फुटबॉल ग्राऊंडवर कसून सराव केला.

५ ऑक्टोबरपर्यंत तिकिटांवर २५ टक्के डिस्काऊंट
हिंदुस्थानात होणाऱया पहिल्याच वर्ल्ड कपच्या लढती नवी मुंबईसह कोलकाता, नवी दिल्ली, गोवा, गुवाहाटी व कोच्ची या शहरांमध्ये रंगणार आहेत. देशातील फुटबॉलप्रेमींना आंतरराष्ट्रीय लढतींचा आनंद स्टेडियममध्ये जाऊन याचि देही याचि डोळा घेता यावा यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत तिकिटांवर २५ टक्के डिस्काऊंट देण्यात आले आहे.

अमेरिका, कोलंबिया, घानाशी टक्कर
हिंदुस्थानचा फुटबॉल संघ साखळी फेरीत अमेरिका, कोलंबिया व घाना या संघाशी दोन हात करणार आहे. हिंदुस्थानच्या लढती ६, ९ व १२ ऑक्टोबरला असणार आहेत. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये हिंदुस्थानच्या लढती रंगणार आहेत.

गेल्या दोन महिन्यांत हिंदुस्थानच्या संघाने कसून सराव केलाय. हिंदुस्थानचा हा संघ जगातील इतर संघाएवढाच तगडा आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. या संघातील खेळाडूंचा वर्ल्ड कपमधील सहभाग हा भविष्यातील युवकांसाठी प्रेरणा ठरेल. आमचा संघ इतिहास रचण्याच्या दिशेने पाऊल टाकतोय. n लुईस मॅटोस, मुख्य प्रशिक्षक

प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होणारे पहिलेच फुटबॉलपटू
हिंदुस्थानच्या युवा संघाने सराव सामन्यात मॉरीशसला ३-० अशा फरकाने हरवत आत्मविश्वास संपादन केलाय. यावेळी मुख्य प्रशिक्षक लुईस नार्टोन डी मॅटोस म्हणाले, हिंदुस्थानच्या फुटबॉल इतिहासात हा क्षण सुवर्ण अक्षराने नोंदवला जाणार आहे. फिफा वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणारे हिंदुस्थानचे हे पहिलेच खेळाडू असणार आहेत. त्यामुळे देशवासीयांसाठी ही अभिमानाची बाब असेल.