१९ वर्षांखालील आशिया कपमधून गतविजेता हिंदुस्थान बाहेर

सामना ऑनलाईन । क्वालालांपूर

१९ वर्षांखालील आशिया कपमध्ये नेपाळनंतर बांग्लादेशनेही हिंदुस्थानचा पराभव केला. त्यामुळे गतविजेत्या हिंदुस्थानचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात बांग्लादेशने हिंदुस्थानचा ८ गडी राखून पराभव करत आशिया कपच्या उपांत्याफेरीत प्रवेश केला.

हिंदुस्थान आणि बांग्लादेशमध्ये क्वालालांपूर येथे झालेल्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने सामना ३२ षटकांचा करण्यात आला. नाणेफेक गमावल्याने प्रथम फलंदाजीला आलेल्या हिंदुस्थानने ३२ षटकांत १८७ धावा केल्या. हिंदुस्थानकडून अनूज रावतने ३४ धावांची खेळी केली.

हिंदुस्थानने दिलेल्या १८८ धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशच्या पिनाक घोष आणि मोहम्मद नईम शेख यांनी ८२ धावांची सलामी दिली. शेख बाद झाल्यानंतर घोषने हम्मद तवहिद ह्रिदोयच्या साथीने संघाला विजयी केले. मात्र सलग दोन पराभवांमुळे गतविजेत्या हिंदुस्थानी संघाचे आशिया कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

आशिया कपमधील पराभवामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड निराश झाला आहे. ‘मी या पराभवामुळे निराश झालो आहे. मात्र खचलेलो नाही. आम्ही नवीन खेळाडूंना संघात संधी देऊन २०१८ मध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी सर्वोत्तम संघ तयार करू असे द्रविडने सांगितले.