हिंदुस्थानचा युवा फुटबॉल संघ जगज्जेत्या फ्रान्सला भिडणार

सामना ऑनलाई । नवी दिल्ली

बलाढ्य अर्जेंटिनाला धूळ चारल्यानंतर आता हिंदुस्थानचा युवा संघ (२० वर्षांखालील) लवकरच जगज्जेता संघ फ्रान्स व उपविजेता संघ क्रोएशिया या दोन तगड्या संघांना भिडणार आहे. अखिल हिंदुस्थानी फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) यांच्याकडून चौरंगी फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेण्यात येत असून त्याअंतर्गत क्रोएशियामध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. यामध्ये हिंदुस्थानसह फ्रान्स, क्रोएशिया व स्लोवेनिया या संघांचा समावेश असणार आहे.

येत्या ४ ते ९ सप्टेंबर या कालावधीत या चौरंगी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय संघाचे एआयएफएफचे संचालक अभिषेक यादव म्हणाले, या वर्षी हिंदुस्थानी संघाचे कॅलेंडर व्यस्त असून जगातील दिग्गज संघासोबत सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे आपला संघ सध्याच्या घडीला कुठे आहे हे समजणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना येणारा दबाव याचे शिक्षण आम्हाला मिळणार आहे. ‘साई’कडूनही मोलाची मदत होत असल्यामुळे विविध वयोगटांत हिंदुस्थानच्या फुटबॉल संघांना प्रोत्साहन मिळत आहे.