मुंबईत भूमिगत वाहनतळ

सामना प्रतिनिधी, मुंबई

वाढत्या लोकसंख्येमुळे पार्किंगची मोठी समस्या निर्माण झालेली असताना आता पालिकेने दोन ठिकाणी भूमिगत वाहनतळ उभारण्याचे ठरवले आहे. भायखळा येथील झुला मैदानाच्या खाली व वांद्रे पश्चिमेकडील रावसाहेब पटवर्धन उद्यानाखाली हे अद्ययावत पार्किंग लॉट उभारले जाणार आहेत.

शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जागा कमी पडू लागली आहे. गाडय़ांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे पार्किंगच्या समस्येने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. त्यामुळे रस्त्यावर कुठेही कशाही पद्धतीने पार्क केलेल्या गाडय़ांमुळे वाहतूककोंडीची समस्या वाढली आहे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नाही. अशा परिस्थितीत पालिकेने आता मनोरंजन मैदाने व उद्याने यांच्या खाली अद्ययावत भूमिगत वाहनतळे बांधण्याचे ठरवले आहे. भायखळा आणि वांद्रे येथे प्रथमच अशी वाहनतळे बांधण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वांद्रे फोर्टच्या आजूबाजूच्या उद्यानांचे सौंदर्यीकरण करून पर्यटकांसाठी आकर्षक विरंगुळ्याची जागा तयार करण्याचेही पालिकेने ठरवले आहे. याबाबतचा प्रस्ताव आजच्या स्थायी समितीमध्ये मंजूर झाला.

पाच वास्तुशास्त्रज्ञांचे पॅनल
पालिकेने भूमिगत वाहनतळांबरोबरच भविष्यात विविध नागरी सुविधा पुरवण्याचे ठरवले आहे. अशा कामांसाठी पालिकेच्या वास्तुशास्त्रज्ञ विभागात पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे या क्षेत्रातील पाच तज्ञ वास्तुशास्त्रज्ञांचे पॅनल पालिकेने तयार केले आहे. कामांचे आराखडे तयार करणे, विविध परवानग्या, मजुरी घेणे अशा विविध कामाची या सल्लागारांवर टाकण्यात आली आहे. पूर्वतयारीच्या कामांसाठी १२ महिने व प्रत्यक्ष बांधकाम पुरे करण्यास ३६ महिने अशा ४८ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.

इथे होणार भूमिगत पार्किंग                            अंदाजे किंमत
भायखळा डिव्हिजन येथील झुला मैदान                 ५७.३५ कोटी
वांद्रे लिंक रोड येथील रावसाहेब पटवर्धन उद्यान           ८८ कोटी