आयकर विभागात नोकरीच्या बहाण्याने बेरोजगारांना चुना

सामना प्रतिनिधी । मुंबई

आयकर विभागात आमची मोठी ओळख आहे. तेथे लिपिक पदाची नोकरी मिळणार याची हमी देतो. नियुक्तीचे पत्र आम्ही देणार तेव्हाच पैसे द्यायचे, अशी बतावणी करून बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघांना ताडदेव पोलिसांनी अटक केली. मात्र मुख्य आरोपी अजून फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मूळचे विदर्भाचे असलेले सोनपाल खचकड हे त्यांच्या मुलासाठी नोकरी शोध होते. ही बाब समजताच सुदेश आणि दिनकर (नाव बदललेले) हे आणि त्यांचे साथीदार खचकड यांना भेटले. आमची आयकर विभागात मोठी ओळख आहे. सात लाखांत तुमच्या मुलाला लिपिक पदाची सरकारी नोकरी मिळवून देऊ, असे त्या भामट्य़ांनी खचकड यांना सांगितले. त्यानंतर आरोपींनी खचकड यांना आयकर विभागातील लिपिक पदाबाबतचे नियुक्तीपत्र दिले आणि अडीच लाख रुपये घेतले. आपल्याला दिलेले नियुक्तीपत्र बोगस असल्याचे खचकड यांना समजल्यानंतर त्यांनी ताडदेव पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अरुण थोरात, उपनिरीक्षक पडावले तसेच कापसे, राठोड, सांगळे या पथकाने जीएसटी कार्यालयात सापळा रचून सुदेश आणि दिनकर यांना पकडले.

मुंबईत लुटतात, अकोल्याला पळतात
आरोपी हे मूळचे अकोला येथील आहेत तर खचकड हेदेखील विदर्भातील आहेत. आरोपी मुंबईत किंवा आजूबाजूच्या परिसरात लॉज, हॉटेल अथवा भाड्य़ाची खोली घेऊन राहतात. टार्गेट केलेल्या व्यक्तीची फसवणूक केल्यानंतर ते पुन्हा अकोला गाठतात. ते भामटे नियुक्तीपत्र कसे बनवतात, बेरोजगार तरुणांना कसे हेरतात, आतापर्यंत त्यांनी अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली आहे, याचा ताडदेव पोलीस शोध घेत आहेत.