नागपुरात विकास ठाकरे, मुत्तेमवारांचा पुतळा जाळला

सामना ऑनलाईन,नागपूर

महापालिका निवडणुकीचं तिकीट नाकारत, एबी फॉर्म परस्पर दिल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री कडबी चौकात शहराध्यक्ष विकास ठाकरे व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे पुतळे जाळले. यावेळी या दोन्ही नेत्यांविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

हिवरीनगरातही काँग्रेस कार्यकर्त्यांचा रोष बाहेर पडला. त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची शवयात्रा काढली. काही कार्यकर्त्यांनी मुंडणही केले. भाजपपाठोपाठ काँग्रेसमध्येही कार्यकर्ते रस्त्यांवर उतरून संताप व्यक्त करू लागले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट गडकरीवाडय़ाचे प्रवेशद्वार ठोठावत संतप्त भावना व्यक्त केल्या. तर, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुतळा जाळून संताप व्यक्त केला.

काँग्रेसच्या उमेदवारांची यादी मुंबईत ठरली. ती बदलून विकास ठाकरे यांनी परस्पर एबी फॉर्म वितरित केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. उमेदवारी मिळालेल्या अनेकांचे नाव कापण्यात आले. काँग्रेसला पराभूत करण्यासाठी ठाकरे व मुत्तेमवार यांनी सुपारी घेतल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे. सायंकाळी 6.30 पासून कार्यकर्त्यांची कडबी चौकात लगबग सुरू होती. अंधार पडताच कार्यकर्त्यांनी चौकात धाव घेत या दोन्ही नेत्यांचे पुतळे जाळले. माजी मंत्री नितीन राऊत यांच्या जवळचे असलेल्या या युवक कार्यकर्त्यांनी युवक आघाडीलाही नियमाप्रमाणे संधी दिली नसल्याचा आरोप केला आहे.