वाकी खापरी आणि भाम धरणग्रस्तांना केंद्रीय मंत्र्यांचा दिलासा

सामना प्रतिनिधी, इगतपुरी

वाकी खापरी धरणाचे बांधकाम करताना जलसंपदा अधिकाऱ्यांनी उत्तम काम केले आहे. धरणग्रस्तांचे अजूनही काही प्रश्न अनुत्तरीत असतील तर शासन ते सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री संजीवकुमार बालियान यांनी केले.

पंतप्रधानांच्या विशेष निधीतून साकारलेल्या वाकी खापरी आणि भाम धरणाच्या प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी बालियान यांनी आज दौरा करून माहिती घेतली. यावेळी बालियान पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, धरणग्रस्त नागरिकांच्या काही समस्या समजून घेतल्या आहेत. त्या समूळ सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. इगतपुरी तालुका नंदनवन असल्याने त्यामध्ये भर पाडण्यासाठी धरणांची भूमिका मोलाची ठरली आहे.

भाम धरणाच्या भेटीप्रसंगी या भागातील धरणग्रस्त ग्रामस्थांनी आपल्या अनेक मागण्यांबाबत कैफियत मांडली. आर. ई. बालीयान यांनी याबाबत संबंधित अधिकारी आणि नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून समस्या सोडवण्याचा शब्द दिला. माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनीही आपल्या मागण्या मांडल्या. याप्रसंगी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता उपासनी, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, नांदूर मधमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता संजीव जाधव, कार्यकारी अधिकारी आर. टी. बागुल, इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी राहुल पाटील, भूसंपादन उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई, तहसीलदार अनिल पुरे, पुनर्वसन अधिकारी कासार, वाकी धरणाचे सहाय्यक अभियंता हरिभाऊ गीते, भाम धरणाचे सहाय्यक अभियंता व्ही. डी. पाटील, गोकुळ पिळोदेकर, मनोहर अरणे, स्वप्नील पाटील, लक्ष्मण खताळे आदींसह या भागातील धरणग्रस्त नागरिक उपस्थित होते.

‘सामना’चे मंत्र्यांनी केले कौतुक
आजच्या दै. ‘सामना’मधील पहिल्या पानावर भाम आणि वाकी खापरी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर बातमी प्रसिद्ध झाल्याने आजचा दौरा करताना चांगला अभ्यास झाला असे संजीवकुमार बालियान यांनी सांगत दै. ‘सामना’चे विशेष कौतुक केले.