Masood Azhar चीनवर अमेरिका भडकली, कारवाईचा दिला इशारा

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला पुन्हा एकदा चीनने पाठिशी घातले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये चीनच्या विरोधामुळे मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होऊ शकला नाही. त्यामुळे हिंदुस्थानला मोठा धक्का बसला. चीनच्या या भूमिकेचा हिंदुस्थानने कठोर शब्दात निषेध केला आहे. हिंदुस्थानच्या मदतीला अमेरिकाही आली असून सातत्याने अडथळा आणणाऱ्या चीनविरोधात कठोर पावलं उचलावी लागतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित झाला नाही, चीन पुन्हा आडवा आला

अमेरिका आणि फ्रान्सने अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे अशी विनंती केली होती. मात्र चीनच्या विरोधामुळे संयुक्त राष्ट्रांना ही विनंती मान्य करता आली नाही. यानंतर अमेरिकेने एक परिपत्रक काढत चीनच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.

‘पाकिस्तान चीनच्या सहाय्याने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या दहशतवादी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवत आला आहे. चीनने सलग चौथ्यांदा मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी होण्यापासून वाचवले आहे. चीनने जर मसूद अजहरला पाठिशी घातले तर सुरक्षा परिषदेच्या अन्य सदस्य देशांना याविरोधात कटोर पाऊल उचलावं लागेल. आशा आहे परिस्थिती नियंत्रणात राहिल’, असे या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

याआधी पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पुन्हा एकदा जैशचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली होती. हिंदुस्थानच्या या मागणीला अनेक देशांनी पाठिंबा दिला होता. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या हिंदुस्थानच्या मागणीला पाठिंबा दिला होता. परंतु चीनने पुन्हा एकदा आपल्या मताचा चुकीचा वापर करत हिंदुस्थानचे मनसुबे उधळून लावले. यावर हिंदुस्थानने कठोर प्रतिक्रिया देत चीनच्या या भूमिकेवरून निराश झाल्याचे म्हटले. तसेच हिंदुस्थानच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्या देशांचे आभार मानले.