ढगाळ वातावरण, अवकाळी पावसामुळे आंबा-काजू पिकाला धोका

सामना प्रतिनिधी । खेड

खेड तालुक्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी अवेळी पावसाचा शिडकावा झाल्याने आंबा व काजू बागायतदार हैराण झाले आहेत. बदललेले वातावरण आणि पावसाचा शिडकावा यामुळे आंबा व काजू या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावर्षी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आंबा व काजू पिकासाठी आवश्यक असलेले थंडीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षानंतर यावर्षी पहिल्यांदाच आंबा, काजू चांगले मोहरले होते. मोहरलेली झाडे पाहून यावर्षी दोन्ही पिकांमधून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा बागायतदारांनी केली होती. किमान यावर्षी तरी आस्मानी संकट कोसळू नये यासाठी बागायतदार प्रार्थना करत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल व्हायला सुरुवात झाली आणि बागायतदारांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या छटा दिसू लागल्या. बुधवारी सकाळी काही ठिकाणी हलक्या सरीही कोसळल्या आणि आंबा व काजू पिकाच्या नुकसानीच्या धास्तीने शेतकऱयांचे चेहरे काळवंडले. हातातोंडाशी येऊ पहात असलेल्या घास अचानक शिडकाव करणाऱ्या पावसामुळे नष्ट तर होणार नाही ना अशी चिंता बागायतदारांना सतावू लागली.

ढगाळ वातावरणाबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात कशी करायची, आंबा व काजू पिकांचे सरंक्षण कसे करायचे? या विवंचनेत असलेल्या बागायतदारांना दापोली येथील बाळसाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाकडून दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरी बागायतदारांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. ढगाळ वातावरणादरम्यान झालेल्या पावसाचा शिडकाव्यामुळे आंबा व काजू पिकावर फारसा परिणाम होणार नाही असे कृषी विद्यापिठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ढगाळ वातावरण असेच राहिले तर मात्र किडिचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचेही विद्यापिठाकडून सांगण्यात आले आहे.