पाटोद्यातील अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत,अनेक ठिकाणी पाणी घरात घुसले

1

सामना ऑनलाईन, येवला

आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील उत्तर भागात विखरणी, विसापूर, कातरणी, कानडी पाटोदा शिवारात बेमोसमी पावासने सुमारे तीन तास हजेरी लावली. पाटोदा परिसरात या अवकाळी पावसाचे प्रमाण अधिक होते. मोठय़ा प्रमाणात वादळी वाऱयासह विजा चमकत होत्या. या पावसामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. पाटोदा व कातरणी शिवारात मोठय़ा प्रमाणात द्राक्ष बागा आहेत. या बेमोसमी पावसामुळे द्राक्ष बागेतील पिकाला तडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पाटोदा परिसरात मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बेमोसमी पावसाने सुमारे पाऊन तास हजेरी लावली. यामुळे हातातोंडाशी आलेला घास या बेमोसमी पावसामुळे हिरावला जातो की कायल्ल अशी भीती या परिसरातील शेतकऱयांना वाटत आहे. तर मोठय़ा प्रमाणात पाऊस आल्यास कांदा बियाण्यासाठी तयार केलेले डोंगळे उद्ध्वस्त होण्याची शक्यता व्यक्त होत असून शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या शेतात द्राक्ष तयार झाले तसेच शेतकऱयांनी शेतात काढून विक्रीसाठी तयार असलेला कांदा भिजल्यामुळे नुकसान झाले आहे.

मंगळवारी दुपारपासून परिसरात दमट वातावरण निर्माण झाले होते पाटोदा व परिसरात रात्री पावणेआठ वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वाऱयासह पावसाने हजेरी लावली. मुसळधार पाऊस व जोरदार वाऱयामुळे वीजपुरवठा खंडित होऊन जनजीवन विस्कळीत झाले. येथील रस्त्यालगत असलेल्या दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने दुकानातील संगणक व इतर उपकरणे पाण्याने भिजली. शेतात असलेले तयार पोळी घालून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱयांचे चांगलीच धावपळ झाली.

थंडी ओसरली अन् बरसल्या सरी…

गेल्या आठवडय़ात हुडहुडी भरणाऱया थंडीने मनमाडकर हैराण झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून थंडी ओसरू लागली. मात्र मंगळवारी सायंकाळी शहर व परिसरात सोसाटय़ाच्या वादळी वाऱयासह मेघगर्जनेने पावसाच्या सरींनी हजेरी लावली. यामुळे या बदलत्या वातावरणात मनमाडकर चिंब भिजले. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी पडत होत्या. अचानक आलेल्या या पावसामुळे सायंकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण हळूहळू कमी होत आले होते. आज दुपारपासून वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत होता. रात्री आठच्या सुमारास अचानक वादळी वाऱयाने मनमाडकरांना हादरवून सोडले. वाऱयाचा वेग प्रचंड होता. अचानक आलेल्या या वादळाने धुळीचे लोळ उठले आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱयामुळे तांत्रिक दोष उद्भवून संपूर्ण शहर अंधारात बुडाले. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. हे वातावरण कांद्यासह इतर पिकांना हानिकारक असून या वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.