भाजपचे रामायण, सीता ही टेस्टटय़ूब बेबी

सामना ऑनलाईन । मथुरा

हास्यास्पद आणि बेताल वक्तव्य करणाऱया भाजप नेत्यांमध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांची आता भर पडली आहे. माता सीता यांचा जन्म टेस्टटय़ूब बेबी तंत्रज्ञानातून झाला असे विधान शर्मा यांनी केले आहे.

मथुरा येथे हिंदी पत्रकारिता दिन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शर्मा यांनी हास्यास्पद वक्तव्य केले. माता सीतेचा जन्म जमिनीत मातीच्या भांडय़ात झाला होता. याचाच अर्थ रामायण काळात टेस्टटय़ूब बेबीचे तंत्रज्ञान होते. त्यामुळे माता सीतेचा जन्म टेस्टटय़ूब बेबीद्वारे झाला असे शर्मा म्हणाले. एवढय़ावरच शर्मा थांबले नाहीत तर महाभारत काळापासून पत्रकारिता सुरू आहे. त्याशिवाय मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्लॅस्टिक सर्जरी, गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत, अणुचाचणी, इंटनेट हे पुरातन काळापासून सुरू असल्याचे तारे शर्मा यांनी तोडले.

बेताल वक्तव्यांची मालिका
– बेताल वक्तव्य करण्याची भाजप नेत्यांमध्ये चढाओढच सुरू आहे. यापूर्वी त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी महाभारत काळात आपल्याकडे इंटरनेट होते असे वक्तव्य केले होते. बेरोजगारी कमी करण्यासाठी पानटपरी टाकण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. सिव्हिल सर्व्हिसमध्ये मेकॅनिकल इंजिनीअर नको, असेही तारे तोडले होते.
– केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी डार्विनचा उक्रांतीवादाचा सिद्धांत चुकीचा असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच न्यूटनच्या गतीच्या नियमांच्या सिद्धांताआधीच आपल्या मंत्रांमध्ये हा सिद्धांत असल्याचे म्हटले होते.

सीतेला रामाने पळवले, गुजरातच्या पाठय़पुस्तकातील मजकूर
बारावीच्या संस्कृत पाठय़पुस्तकात सीतेचे अपहरण रावणाने नाही तर प्रभू श्रीरामाने केल्याचे म्हटले आहे. गुजरात उच्च माध्यमिक बोर्डाच्या पाठय़पुस्तकातील या चुकीमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. बारावी संस्कृतच्या पाठय़पुस्तकातील १०६ व्या पानावर महाकवी कालिदास यांची ‘रघुवंशम’ ही कविता छापली आहे. त्यात माता सीतेचे हरण रावणाने नाही तर रामाने केल्याचे म्हटले आहे. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी हे पाठय़पुस्तक आहे. बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. नितीन पेठानी यांना सुरुवातीला एवढी मोठी चूक झाल्याची माहिती नव्हती.