उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एका विदेशी पर्यटकाला मारहाण

सामना ऑनलाईन । सोनभद्र

हिंदुस्थानात पर्यटनासाठी आलेल्या स्विस जोडप्याला आग्रा येथे बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता आणखी एका विदेशी पर्यटकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या सोनभद्र रेल्वे स्थानकावर एका जर्मन नागरिकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अमन यादव असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

आरोपी अमन यादव याने मात्र आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. तसेच पर्यटनासाठी आलेल्या जर्मन नागरिकानेच आपल्याला मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप केला आहे. मी जर्मन नागरिकाला ‘वेलकम टू इंडिया’ असं म्हणून त्याचं स्वागत केलं, तर यावर त्याने मला ठोसा लगावला. तसेच तो माझ्यावर थुंकलाही, असं अमन यादवने म्हटलं आहे. मारहाण झालेला जर्मन नागरिकाला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.