कुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त विधान

2

सामना ऑनलाईन । वाराणसी

योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेटमंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. वाराणसी येथे एका पत्रकार परिषदेत त्यांनी कुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे भाजपची नौटंकी असल्याची टीका केली आहे. तसेच 24 फेब्रुवारीपर्यंत उत्तर प्रदेशातील आरक्षणाची टक्केवारी जाहीर करा, अन्यथा त्याच दिवशी उत्तर प्रदेशातील 80 जागांवर उमेदवारांची घोषणा करणार असल्येचा इशाराही राजभर यांनी दिला आहे.

नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणाऱ्या ओमप्रकाश राजभर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनाच लक्ष्य केले आहे. सरकारने कुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलनावर केलेला खर्च हा वायफळ आहे. त्यामुळे या देशाचे कधीच भले होणार नाही. हाच पैसा जर शिक्षण आणि आरोग्य सेवांवर खर्च केला तर जनतेचे भले होईल. भाजप मतांसाठी हिंदू-मुस्लीम आणि मंदिर-मशीदचा खेळ खेळत असल्याचा आरोपही ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे.