उत्तरप्रदेश पोलिसांचं नवं रुप; वर्दीवर असणार ‘या’ देवाचा फोटो

सामना ऑनलाईन । वारणसी

उत्तरप्रदेश सरकारनं मथुरेतील वृंदावन क्षेत्राला पवित्र तीर्थस्थान म्हणून घोषित केलं आहे. यासोबतच सरकार येथील पोलिसांना देखील नवं रुप देण्यासाठी तयार आहे. मथुरा पोलिसांच्या वर्दीत काही बदल करण्यात येणार आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, मथुरा पोलिसांच्या वर्दीवर लवकरच भगवान श्रीकृष्णांचा बॅच दिसणार आहे. वर्दीवर पर्यटन पोलीस असं लिहिले असणार आहे, तसेच त्यांच्या रॅंकनुसार बिल्ला असेल.

पोलिसांना टूरिस्ट फ्रेंडली असल्याचे दाखवण्यासाठी हा लोगो लावण्यात येणार असल्याची माहिती मथुराचे एसएसपी स्पप्निल मनगेन यांनी दिली. काही दिवसांपुर्वी फत्तेपूर सिकरीमध्ये स्विस जोडप्याला मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर उत्तरप्रदेश पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यामुळेच पर्यटकांना आणि नागरिकांना पोलीस मित्र वाटावेत यासाठी वर्दीत बदल करण्याचे ठरविले आहे.

मात्र या प्रस्तावाला डीजीपींच्या परवानगीची आवश्यकता आहे. मात्र अशा प्रकारच्या लोगोमुळे धर्मनिरपेक्षतेला तडा जाईल, असे अनेकांचे म्हणणे आहे. काँग्रेस प्रवक्ता विवेक बंसल म्हणाले की, हिंदुस्थान एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून सरकारने अशाप्रकारे कोणत्याही धर्माचा प्रचार करू नये. सर्व धर्माचे पर्यटक याठिकाणी येत असतात, त्यामुळे अशाप्रकारच्या लोगोमुळे चुकीचा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो.