…आणि पुलवामावर बोलताना योगींना रडू कोसळले

सामना ऑनलाईन। लखनौ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ‘मन की बात’ या कार्यक्रमादरम्यान भावूक झाल्याने त्यांना रडू कोसळले. या कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याने जम्मू-कश्मीरमधील दहशतवादावर त्यांना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे देताना अचानक योगी भावूक झाले. कंठ भरून आल्याने क्षणभरासाठी त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. अखेर अश्रूंनी भावनांना मोकळी वाट करून दिली आणि योगींच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते कोणालाही दिसू नयेत म्हणून योगींना लगेचं आपली आसवं रुमालात टीपली.

लखनौ येथे शुक्रवारी ‘युवाओ के मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून योगींना आमंत्रित करण्यात आले होते. योगींशी गप्पा मारता येणार असल्याने विदयार्थी उत्सुक झाले होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योगी शांतपणे उत्तर देत होते. आदित्य नावाच्या बीटेकच्या विद्यार्थ्याने योगींना पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादासंदर्भात एक प्रश्न विचारला. एकामागोमाग एक दहशतवादी हल्ले होत आहेत. जवान शहीद होत आहेत. अशावेळी तुमचे सरकार काय करतंय? असा थेट प्रश्न त्याने योगींना विचारला. अचानक आलेल्या या प्रश्नावर बोलताना मात्र योगी क्षणभर भावूक झाले. त्यांनी हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असल्याचे सांगत लवकरच दहशतवादाचे समूळ उच्चाटन केले जाईल असे सांगितले. यादरम्यान पुलवामा हल्ल्यावर बोलताना त्यांचे डोळे भरून आले. पण लगेचच त्यांनी स्वत:ला सांभाळले.