युपीत ‘सायकल’ बॉम्ब फुटला!

115

लखनऊ– उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्यानंतर अवघ्या दोनच तासांत पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी त्या दोघांची पक्षातून आज हकालपट्टी केली. आम्हीच आता नवीन मुख्यमंत्री ठरवू, असे मुलायमसिंहांनी जाहीर केल्यामुळे अखिलेश यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मुख्यमंत्री पदावर अखिलेश राहणार की नवीन नेता येणार? किंवा राष्ट्रपती राजवट लागू होणार? हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. निवडणुकीतील तिकीट वाटपावरून समाजवादी पार्टीला सुरुंग लागल्यानंतर ‘यूपी’त सायकल बॉम्ब फुटला. पक्षात उभी फूट पडल्यानंतर लखनौच्या रस्त्यारस्त्यांवर संतापाचा भडका उडाला. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यातच पक्षाच्या एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या विरोधात त्यांच्या बंगल्यासमोर स्वत:ला पेटवून घेतले.

मुलायमसिंग यांनी कारवाईचा निर्णय जाहीर केल्यानंतर उत्तर प्रदेशात धमाकाच झाला. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या निवासस्थानासमोर त्यानंतर अलोट गर्दी उसळली. त्यांचे समर्थक, कार्यकर्ते ‘अखिलेश झिंदाबाद’च्या घोषणा देत होते.
अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव या दोघांनी पक्षविरोधी कारवाया केल्या. आम्ही कष्टाने वाढवलेल्या पक्षाला त्यांच्यामुळे धोका निर्माण झाला आहे, असा आरोप मुलायमसिंग यांनी पत्रकार परिषदेत केला. रामगोपाल यादव यांनी गटबाजी करून अखिलेशला फसवले आहे. ते आपल्याला कमजोर करीत आहेत हे अखिलेशच्या लक्षात आले नाही, असे मुलायम म्हणाले.

रामगोपाल यादव यांनी रविवारी आयोजित केलेले पक्षाचे संकटकालीन राष्ट्रीय प्रतिनिधी संमेलन बेकायदेशीर आहे. अशा संमेलनासाठी १० ते १५ दिवसांची नोटीस द्यावी लागते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यपालांची घडामोडींवर नजर
उत्तर प्रदेशातील ताज्या राजकीय घडामोडींवर आपले लक्ष आहे, असे राज्यपाल राम नाईक यांनी रात्री उशिरा सांगितले. राज्याचा नवा मुख्यमंत्री लवकरच आपला पक्ष निवडेल, असे मुलायमसिंग यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे यापुढे राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. उत्तर प्रदेशातील ताज्या घडामोडी या सत्ताधारी पक्षातील पेचप्रसंग आहे काय, या प्रश्‍नावर तो पक्षांतर्गत मामला आहे, असे उत्तर राज्यपाल नाईक यांनी दिले.

फुटीची सुरुवात
– समाजवादी पक्षातील यादवीची सुरुवात सहा महिन्यांपूर्वीच झाली. सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलेले अमरसिंह यांना पक्षात पुन्हा घेऊन राज्यसभेची खासदारकी दिली गेली. अमरसिंह यांना खासदार करण्यास मुख्यमंत्री अखिलेश यांचा विरोध होता. मात्र शिवपाल यांनी अमरसिंह यांना पुन्हा पक्षात आणले. – तीन महिन्यांपूर्वी यादवीने जोर पकडला. मुलायमसिंहांनी मुख्यमंत्री अखिलेश यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले आणि भाऊ शिवपाल यांना दिले. त्यानंतर अवघ्या २४ तासांत अखिलेश यांनी काका शिवपाल यांच्याकडील महत्त्वाची खाती काढून घेतली. त्यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी केली. – यानंतर चुलत भाऊ रामगोपाल यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली. मात्र आठ दिवसांत परत पक्षात घेतले. – मुलायमसिंहांनी अनेक बैठका घेतल्या. अखिलेश आणि शिवपाल यांच्यात दिलजमाईचा प्रयत्न केला. त्यानंतर गेले दोन महिने ही यादवी थांबल्याचे चित्र दिसत होते. मात्र मुलायमसिंहांनी विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आणि अक्षरश: ‘दंगल’ सुरू झाली. अखेर सपात फूट पडली आहे.

काय होऊ शकते?
– उत्तर प्रदेश विधानसभेत आमदारांची संख्या ४०४ आहे. त्यात सपाचे २२९, बसप ८६, भाजप ४०, काँग्रेस २८, आरएलडी ८, अपक्ष आणि इतर १६ आमदार आहेत. – बहुमतासाठी २०३ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. – उत्तर प्रदेश विधानसभेची मुदत २७ मार्चला संपत आहे. तत्पूर्वी जानेवारी महिन्यात कधीही निवडणूक जाहीर होऊ शकते. – या अल्पकाळासाठी नवीन मुख्यमंत्र्याची निवड करायची असल्यासही विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागेल. अखिलेश यांना २०३ आमदारांचा पाठिंबा आहे का? मुलायमसिंह यांच्यामागे किती आमदार आहेत, हे या वेळी स्पष्ट होईल. – या राजकीय गोंधळात राज्यपालांकडून केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली जाऊ शकते. त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या राज्यात सध्या राजकीय अनिश्‍चितता पसरली.

उद्याची संकटकालीन बैठक होणारच
कारणे दाखवा नोटिसीनंतर दोनच तासांत अखिलेश आणि माझे केलेले निलंबन ‘घटनाविरोधी’ आहे, असे सपाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी सांगितले. ते म्हणाले की, पक्षाचा प्रमुखच जर घटना मोडीत काढत असेल तर पक्ष वाचविण्याची जबाबदारी सरचिटणीसावरच येऊन पडते. त्यामुळे पक्षाची संकटकालीन राष्ट्रीय प्रतिनिधी बैठक आपण रविवारी बोलावली आहे. ती होणारच.

अखिलेशकडे आज आमदारांची बैठक
मुलायमसिंह यांनी अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांच्या केलेल्या हकालपट्टीनंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उद्या रविवारी सकाळी ९ वाजता पक्षाच्या आमदारांची बैठक तातडीने बोलावली आहे.

वाद का पेटला?
मुलायमसिंह आणि शिवपाल यांनी ३२५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्या यादीत अखिलेश यांच्या समर्थकांचे ‘पत्ते’ कापण्यात आले होते. तसेच अखिलेश यांचा विरोध असलेल्यांचा उमेदवारांमध्ये भरणा होता. त्यामुळे अखिलेश कमालीचे नाराज होते. त्यातून अखिलेश यांनी आपल्या २३५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती.

मुलायमसिंहांकडे उमेदवारांची बैठक
मुलायमसिंह आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी आतापर्यंत ३९३ उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. त्या उमेदवारांची बैठक उद्या रविवारी मुलायमसिंह यांनी बोलावली आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या