उत्तर प्रदेशच्या मदरशातून ‘जैश’चे दोन अतिरेकी जेरबंद

सामना ऑनलाईन। लखनौ

उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील देवबंदच्या मदरशातून ‘जैश ए मोहंमद’च्या दोन अतिरेक्यांना जेरबंद करण्यात आले. शाहनवाज अहमद तेली आणि आकिब मलिक अशी या दोघांची नावे असून ते कश्मीरचे रहिवासी आहेत. या दोघांकडून पिस्तूल, काडतुसे तसेच मोठय़ा प्रमाणावर जिहादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, न्यायालयाने या दोघांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या कश्मिरी तरुणांची नावे शाहनवाज अहमद तेली व आकिब मलिक आहे. शाहनवाज हा बॉम्ब बनवण्यात निष्णात असून तो केव्हा उत्तर प्रदेशात आला याची माहिती घेण्यात येत असल्याचे सिंह यांनी सांगितले. शाहनवाज हा कुलगामचा असून आकिब हा पुलवामा येथील राहणारा आहे. ‘जैश ए मोहंमद’साठी दोघेही अतिरेक्यांची भरती करत होते.