कुंभमेळय़ात दोन हजार टन कचऱयाचा ढीग

63

सामना ऑनलाईन। प्रयागराज

प्रयागराजच्या कुंभमेळ्यात स्वच्छतेचा डंका वाजवणाऱया उत्तर प्रदेश सरकारसमोर आता दोन हजार टन कचरा कसा हटवायचा याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. हा सर्व कचरा कुंभमेळ्याच्या ठिकाणापासून सात किमी अंतरावर असलेल्या गावातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या बाहेर पडलेला आहे. पावसाळ्यापूर्वी कचऱयाची विल्हेवाट लागली नाही, तर रोगराई पसरण्याची भीती आहे. कुंभमेळ्यावर 4200 कोटी रुपये खर्च करणाऱया उत्तर प्रदेश सरकारचे नियोजन कचऱयात गेल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी कुंभमेळ्यात देशविदेशातून लाखो भाविक हजेरी लावतात. दीड महिने हा मेळा सुरू राहतो. या काळात मोठय़ा प्रमाणात कचरा निर्माण होतो. या कचऱयावरून राष्ट्रीय हरित लवादाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती अरुण टंडन यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती बनवली होती. हा कचरा मोकळ्या जागी ठेवल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या महिन्यात कचरा तत्काळ हटवण्याचे आदेश लवादाने प्रयागराज सरकारला दिले होते.

कचरा प्रकल्पाची क्षमता संपली
बसवार गावातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सप्टेंबर 2018 पासून बंद आहे. दररोज 400 टन कचऱयाची विल्हेवाट लावण्याची या प्लांटची क्षमता आहे, मात्र तिथे दररोज 600 टन कचरा पोचत आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या सचिवांनी उत्तर मागितले होते.

पावसाळ्यात परिस्थिती हाताबाहेर
पावसाळ्यापूर्वी कचरा हटवला नाही तर कुंभमेळा क्षेत्राच्या आसपास असलेल्या बसवार, ठाकूरपुरवा, मोहब्बतगंज, बुंगी आणि सिमता या गावांमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाईल. दुर्गंधी आणि डासांमुळे गावकऱयांना गावात राहणे कठीण होईल.

आपली प्रतिक्रिया द्या