पुन्हा एकदा चिरनेर ग्रामपंचायतीवर भगवा फडकणार

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

चिरनेर ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या २६ डिसेंबर रोजी होणार असून शिवसेनेने सरपंचपदासाठी भास्कर मोकल यांच्यासारखा तगडा व उच्चशिक्षित उमेदवार दिला आहे. भास्कर मोकल यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस, शेकाप, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या पक्षांनी आघाडी केली आहे. मात्र भास्कर मोकल यांना मिळत असलेल्या लोकांच्या पाठिंब्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

उरण तालुक्यातील प्रतिष्ठित ग्रामपंचायत म्हणून चिरनेर ग्रामपंचायतीची ओळख आहे. या ग्रामपंचायतीत मागील १० वर्षे शिवसेना-शेकापची सत्ता आहे. तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गावात शिवसेनेची चांगली ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेला रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपली तत्वे बासनात गुंडाळून एकमेकांच्या गळ्यात गळे घातले आहेत. ग्रामपंचायतीच्या १५ जागांसाठी व थेट सरपंच पदासाठी येथे आघाडी विरोधात शिवसेना अशी लढत होणार आहे. शिवसेनेने येथे माजी पंचायत समिती सदस्य भास्कर मोकल यांना रणांगणात उतरविले आहे. भास्कर मोकल हे उच्चशिक्षित असून त्यांनी एमबीए पूर्ण केले आहे. पंचायत समिती सदस्याच्या काळात त्यांनी गावामध्ये अनेक विकासाची कामे केली आहेत. अनेक शिबिरे लावून विविध प्रकारचे दाखले व लोकांची आरोग्य तपासणी केली आहे. चिरनेर गाव कचरा मुक्त होण्यासाठी ओएनजीसीकडे सातत्याने पाठपुरावा करून घंटागाडी व ६० कचराकुंड्या मिळवून दिल्या आहेत. अनेक सामाजिक मंडळांना अर्थिक मदत दिली आहे.

भास्कर मोकल यांची काम करण्याची पद्धत आणि मीतभाषीपणा यामुळे विरोधी पक्षाचे लोक देखिल मोकल यांना मदत करण्यास सरसावले आहेत. काँग्रेस आघाडीने येथे संतोष चिर्लेकर यांच्या गळ्यात सरपंचपदाची उमेदवारी लादली आहे. तर इतर दोन अपक्ष उमेदवार देखिल रिंगणात आहेत. शिवसेनेने प्रभाग क्रमांक १ मधून शिमग्या कातकरी, ठाकुर सुलोचना, मुंबईकर कुंदा प्रभाग क्रमांक २ मध्ये विवेक केणी, रसिका म्हात्रे, सुभद्रा म्हात्रे प्रभाग क्रमांक ३ मध्ये काशिनाथ खारपाटील, प्रतिक्षा मोकल, संध्या नारंगीकर, प्रभाग क्र-४ मध्ये धनेश ठाकूर, धर्मेंद्र म्हात्रे, फुंडेकर विनंती, प्रभाग क्रमांक-५ मध्ये प्रशांत पाटील, सोनाली चिरनेरकर व सुरेखा कातकरी यांना उमेदवारी दिली आहे.