जेएनपीटी कामगारांचे बेमुदत आंदोलन

62

सामना प्रतिनिधी। उरण

जेएनपीटीमध्ये रिक्त झालेल्या 347 जागांवर प्रकल्पग्रस्त भुमीपूत्रांची त्वरित भरती करण्यात यावी,मँनिंग पँटर्न प्रमाणे कामकाज सुरू ठेवा,मालकीच्या बंदरात यंत्र-सामुग्री आणि मनुष्यबळ वाढविण्यात यावे,नफ्यात चालणाऱ्या जेएनपीटी बंदराच्या खासगीकरणाचे प्रयत्न थांबविण्यात यावेत आदी विविध मागण्यांसाठी जेएनपीटी कामगारांनी 24 मे पासून जेएनपीटी बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. जेएनपीटी विरोधात उभारण्यात येणाऱ्या बेमुदत बंद आंदोलनात सर्वच कामगार संघटना सहभागी होणार असल्याची माहिती विविध कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (21) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

जेएनपीटी उभारणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी दिलेले बलिदान आणि त्यागाचा जेएनपीटीला विसर पडला आहे. प्रकल्पग्रस्त,स्थानिक भूमीपुत्र आणि जेएनपीटी कामगारांप्रती प्रशासनाची भूमिका बदलत चालली आहे. मागील तीन दशकांपासून जेएनपीटी कामगारांनी बंदराच्या विकासाकरिता केलेल्या सहयोगाकडे दुर्लक्ष करुन कामगारांवर दबाव तंत्राचा वापर करत आहे. तसेच जेएनपीटी प्रशासन कामकाज पध्दतीत आणि सेवाशर्थींमध्ये कामगारांना डावळून एकतर्फी बदल करू लागली आहे. जेएनपीटीच्या स्वतःच्या मालकीच्या कंटेनर टर्मिनलमध्ये मागील दोन वर्षांपासून व्यवसाय घसरणीला लागला आहे. या घसरणीमागे जेएनपीटीचेच काही अधिकारी दोषी आहेत. मात्र मूळ प्रश्नांना बगल देत जेएनपीटीचे भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कामगारांवरच दोषारोप करीत बंदराचे खासगीकरणाचा कुटील डाव रचला आहे. जेएनपीटीत 347 रिक्त जागा आहेत.मागील 17-18 वर्षींपासून क्लास 3 व 4 च्या रिक्त जागेवर जेएनपीटीने कामगारांची भरतीच केलेली नाही. उलट आवश्यकता नसतानाही 15 अतिरिक्त अधिकाऱ्यांच्या जेएनपीटीने नव्याने नियुक्त्या केल्या आहेत. येथील भूमीपुत्र आणि मृत कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकऱ्या दिलेल्या नाहीत. जेएनपीटीचे कंटेनर टर्मिनल अतिशय क्षमतेने चालवून उत्पादकता वाढविण्यासाठी बंदरातील सर्वच कामगार संघटनांनी जेएनपीटी प्रशासनाकडे अनेकदा मागण्याही केल्या आहेत.

मात्र कामगारांच्या मागण्या विचारात न घेता जेएनपीटी व्यवस्थापन कामगारांवरच दडपशाही करण्याचा प्रयत्न करीत आहे. जेएनपीटी व्यवस्थापनाकडून कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी जेएनपीटी विरोधात 24 मे पासून पुकारण्यात आलेल्या जेएनपीटी बंद आंदोलनाची माहिती देण्यासाठी मंगळवारी (21) जेएनपीटीच्या विविध कामगार संघटनांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.जेएनपीटीच्या कामगार वसाहतीतील स्पोर्टस क्लबमध्ये आयोजित करण्यात आली होती.

या प्रसंगी जेनपीटी माजी कामगार ट्रस्टी तथा जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील,जेनपीटी माजी कामगार ट्रस्टी तथा जेएनपीटी वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी रवी पाटील,न्हावा-शेवा पोर्ट अँण्ड जनरल वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी सुदेश देसाई,जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी जनार्दन बंडा,महाराष्ट्र संघटीत -असंघटीत कामगार सभेचे सेक्रेटरी नितीन माळी आणि पदाधिकारी,कामगार उपस्थित होते.
कामगारांच्या मागण्यांबाबत भारत सरकारच्या सहाय्यक कामगार आयुक्तकडे 23 मे रोजी बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत जेएनपीटी व्यवस्थापनाने आपली आठमुठी,एकतर्फी,स्थानिकांवर अन्याय करणारी भूमिका बदलली नाही तर जेएनपीटी विरोधातील 24 मे रोजी जाहीर करण्यात आलेला बेमुदत जेएनपीटी बंदचा संघर्ष अटळ आहे.या बंद आंदोलनात न्हावा-शेवा बंदर कामगार ( अंतर्गत ) संघटना वगळता सर्वच कामगारसंघटना सहभागी होणार असल्याची माहितीही पत्रकार परिषदेतून देण्यात आली. मागील 17-18 वर्षींपासुन क्लास 3 व 4 च्या रिक्त जागेवर जेएनपीटीने स्थानिक भूमीपुत्र आणि प्रकल्पग्रस्त कामगारांची भरती करण्यासाठी वेळ प्रसंगी मार्चे,धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या