कामगार आणि कामगार नेत्यांच्या आततायीपणा नडला; कंपनीला ठोकले टाळे

सामना प्रतिनिधी । उरण

कामगारांनी घेतलेली असहकाराची भुमिका, कामगारांकडून झालेली अधिकारी, ऑपरेटर यांना मारहाण आणि स्थानिक पुढारी, नेते, कामगार संघटनांच्या आततायीपणाला कंटाळुन अखेर मागील २५ वर्षांपासून सुरु असलेल्या द्रोणागीरी नोडमधील एपीएम टर्मिनल (मर्क्स) व्यवस्थापनाने स्वत:हून प्रकल्पालाच टाळे ठोकून कंपनी लॉकऑऊट केली आहे. यामुळे या टर्मिनलमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसह सुमारे ५०० कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे.

येथील द्रोणागिरी नोडमध्ये एपीएम (मर्स्क ) कंपनीचे कंटेनर टर्मीनल आहे. एपीएम या बहुराष्ट्रीय कंपनीचे बहुतांश कंटेनर हाताळणी आणि इतर कामे ठेकेदारी पध्दतीवर देण्यात आली आहे. पर्ल फ्रेंटस् सर्व्हीसेस या ठेकेदार कंपनीकडे असलेल्या कंत्राटी कामात सुमारे १८७ कामगार काम करीत होते. डीपीडी धोरणामुळे एपीएम कंटेनर टर्मिनलमध्ये कंटेनर हाताळणीचे काम कमी झाले आहे. त्याशिवाय कामगारही असहकाराची भुमिका घेत असल्याने कामाची गती मंदावली होती. कामगारांच्या असहकार्याच्या भुमिकेमुळे तेच काम कंपनीला दुसऱ्या माथाडी कामगारांकडून करून घ्यावे लागत होते. त्यामुळे कंपनीच्या आर्थिक उत्पन्नावरही त्याचा विपरित परिणाम जाणवत होता. त्यामुळेच कंपनीने कामगार कपातीचे धोरण अवलंबिल्याचा आरोप कामगार संघटनांकडून केले जात आहेत. त्यामुळे पर्ल फ्रेंट सर्व्हीसेस या ठेकेदारीवर काम करणाऱ्या कंपनीने ९९ कामगारांना कमी केले आहे. त्याविरोधात २ फेब्रुवारीपासून एपीएम टर्मिनलमध्ये ठेकेदारीत काम करणाऱ्या कामगारांनी संपाचे हत्यार उगारले होते. मागील सात दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे मात्र एपीएम कंटेनर टर्मिनलचे कंटेनर हाताळणीचे काम ठफ्प झाले होते. त्यामुळे एपीएम टर्मिनल व्यवस्थापनाने ठेकेदारी पध्दतीवर काम करणाऱ्या कामगारांचा संप बेकायदेशीर ठरवित ठेकेदार कंपनी पर्ल्स फ्रेंट सर्व्हीसेस कंपनीच्या संचालक जमशेद अश्रफ यांनाच बुधवारी (७) नोटीस धाडली होती. कंपनीच्या कामगारांनी बेकायदेशीर सुरु केलेला संप १२ तासात चर्चा करून मागे घ्यावा. अन्यथा पर्ल्स फ्रेंटस् कंपनीचे कंत्राटच रद्द करण्याचा लेखी पत्राव्दारे निर्वाणीचा इशारा एपीएम टर्मीनल (मर्स्क) व्यवस्थापनाने दिला होता. मात्र त्यानंतरही एपीएम टर्मिनल व्यवस्थापनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून संप सुरुच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी जाहीर केला होता. त्यातच कामगार पुढारी, राजकीय पुढारी नेत्यांनी परिसरातील सुरु असलेले सुमारे ४५ कंटेनर टर्मीनलचे (सीएफएस ) कामकाज सोमवारी बंद करण्याचा इरादा जाहीर करण्यात आला होता. त्यातच गुरुवारी एपीएम टर्मीनलमध्ये कामासाठी येणाऱ्या अधिकारी आणि ऑपरेटर कामगारांना गाडया अडवून मारहाण करण्याचा दुदैवी प्रकार घडला असल्याचा आरोप कंपनी व्यवस्थापनाने केला आहे. त्यामुळे कामगार आणि अधिकाऱ्यांच्या जिविताशी खेळ नको म्हणून एपीएम (मर्स्क ) व्यवस्थापनाने स्वत:हून कंपनीला टाळे ठोकून कंपनीच लॉकऑऊट करुन टाकली असल्याची माहिती एपीएम व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

याबाबत कामगार संघटनेच्या नेत्यांकडे विचारणा केली असता कामगार एपीएम टर्मिनलमध्ये प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करीत आहेत. कामगार कंपनी व्यवस्थापनाला चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत. विविध राजकीय कामगार पुढारी, नेते यांच्याकडूनही कामगारांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे कामगार आणि कामगार संघटनांचे पुढारी, नेते यांच्यावर कंपनी व्यवस्थापनाकडून होत असलेले आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन असल्याचा दावा ट्रान्सपोर्ट अॅण्ड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी श्रीराम यादव यांनी माहिती देताना केला. सोमवारी उरण परिसरातील सर्वच सीएफएसमधील बंद करण्याबाबत चर्चा झाली असुन त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचेही यादव म्हणाले. कंपनी अधिकारी आणि ऑपरेटर यांनाही गाडीची वाट अडवून मारहाण केल्याचा कंपनीने केलेला आरोपही बिनबुडाचा असल्याचा दावाही यादव यांनी केला आहे. एपीएम (मर्स्क) व्यवस्थापनाने कंपनी लॉकऑऊट केल्याबाबत आपणाकडे कोणतीही माहीती नसल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.