उरणकरांना रेल्वेची प्रतिक्षा करावी लागणार

सामना प्रतिनिधी। उरण

उरणकरांना मार्च २०१८ पर्यंत रेल्वेची प्रतिक्षा करावी लागणार आहे. सिडकोने यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत खारकोपर पर्यंत रेल्वे सूरू करण्याची योजना आखली होती. मात्र रेल्वेस्थानकांची कामेच पूर्ण झाली नाहीत. यामुळे ही रेल्वे सूरू होण्यासाठी दिरंगाई झाल्याची कबूली सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नेरूळ- उरण रेल्वे प्रकल्पातील नेरूळ-खारकोपर हा पहिला ८ किलोमीटरचा टप्पा डिसेंबर-१७ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पातील तरघर, बामणडोंगरी व खारकोपर या रेल्वेस्थानकांची कामे अपूर्ण आहेत. तर नेरूळ, सिवूड, सागरसंगम या स्थानकांवरील फलाटांचे काम सुरू आहे. उरण-नेरूळ या २७ किलोमीटरच्या प्रकल्पासाठी सुमारे १७८२ कोटी रूपये खर्च करण्यात येणार असून यातील ६७ टक्के खर्चाचा वाटा सिडको उचलणार आहे तर ३३ टक्के वाटा भारतीय रेल्वेकडून उचलण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील नेरूळ-खारकोपर या दरम्यानचे रेल्वरूळ टाकण्याचे काम जवळ-जवळ पूर्ण झाले असून तिन स्थानकांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या रेल्वेमार्गावरील रूळांची चाचणी देखिल जूलै महिन्यात पार पडली आहे.

या भागात नव्याने होणारे नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ आणि सिडको तर्फे विकसित करण्यात येत असलेला उलवे रोड यामुळे या रेल्वेला विशेष महत्व आहे. सध्या उलवे नोड परिसरात प्रचंड मोठ्या इमारती झाल्या असून लोकवस्ती देखिल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या लोकांना एनएमएमटी व खाजगी वाहनांच्या व्यतिरिक्त प्रवासाचे कोणतेही साधन नाही. या भागात रेल्वे सुरू झाल्यास येथिल भागाचा आणखी जलदगतीने विकास होण्यास मदत होईल त्यामुळे या लोकांना ही रेल्वे सूरू होण्याची प्रतिक्षा आहे.

या बाबत सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याकडे विचारणा केली असता- नेरूळ-खारकोपर दरम्यानचे रेल्वे रूळ टाकण्याचे आणि इतर कामे पूर्ण झाली आहेत. तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर या स्थानकांची कामे देखील वेगाने सुरू आहेत. मार्च २०१८ अखेर पर्यंत ही कामे पूर्ण करून खारकोपरपर्यंत ही रेल्वे सूरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल. असे त्यांनी सांगितले.