उरण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, आरोपींना २ तासांत अटक

1

राजकुमार भगत । न्हावाशेवा

जेएनपीटी परिसरात ट्रेलर चालकांना अडवून त्यांना लुटणाऱ्या लुटारूला उरण पोलीसांनी अटक केली आहे. जयराज यशवंत कोळी (२१ रा. हनुमान कोळीवाडा) असे या आरोपीचे नाव आहे. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरांनी पागोटे उड्डाण पुलावर मारूती महादेव गरंडे चालवत असलेला ट्रेलर अडवून त्याच्याकडील रोख रक्कम ३ हजार ५००, चांदिचे ब्रेसलेट व एटीम चोरले होते. तर आसाराम बापूसाहेब दराडे या चालकाचे ६००० रूपये लुटले होते. या लुटारूने मारूती गरंडे याच्या चोरलेल्या एटीएम मधून ११ हजार रूपये काढले होते.

पोलीसांत या बाबत गरंडे यांनी तक्रार दिल्यानंतर उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश तांबे आणि जी.व्ही. कराड यानी तत्परतेने तपास करून अवघ्या दोन तासात आरोपीला पाठलाग करून पागोटे पुलाजवळ पकडले. त्याच्याकडून मोटारसायकल, एटीएम, लुटलेली रक्कम व एटीएम मधून काढलेली रक्कम जप्त केली आहे. उरण पोलीसांच्या या तत्परतेमुळे एका सराईत आरोपीला पकडण्यास यश आले आहे.