‘सर्जिकल स्ट्राईक’चा थरार आता मोठ्या पडद्यावर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लष्कराने पीओकेमध्ये घुसून केलेला सर्जिकल स्ट्राईक ही हिंदुस्थानी नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. हिंदुस्थानी जवानांनी केलेल्या शौर्यावर रॉनी स्क्रूवाला चित्रपट निर्मिती करणार आहे. चित्रपटाचे नाव ‘उरी’ असे असणार आहे. या चित्रपटात विक्की कौशल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाबाबत स्क्रूवाला यांची फिल्म कंपनी आरएसव्हीपी येत्या काही दिवसात महत्त्वाची घोषणा करणार आहे. त्यामुळे दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा अनुभव तुम्हाला लवकरच मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे.

‘गोळ्या कानाजवळून जात होत्या!’, सर्जिकल स्ट्राईकमधील मेजरचा अनुभव

‘हिंदुस्थानी लष्कराचे शौर्य पडद्यावर आणणे नक्कीच अभिमानास्पद आहे. सीमेपार कारवाई करत हिंदुस्थानने जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. उरी हल्ल्यानंतर जवानांनी केलेले सर्जिकल स्ट्राईक एक अविस्मरणीय कथा आहे आणि ती पडद्यावर आणताना मोठा आनंद होईल, असे चित्रपट निर्माता कंपनीतील एका सदस्याने सांगितले.

मागील वर्षी १८ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी उरी येथील हिंदुस्थानच्या सैन्य तळावर हल्ला केला होता. यात हिंदुस्थानचे १९ जवान शहीद झाले होते उरीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर ११ दिवसांनी हिंदुस्थानी लष्कराने पीओकेमध्ये घुसून कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. या हल्ल्यांमध्ये ३८ ते ४० दहशतवादी आणि पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले. तसेच दहशतवाद्यांचे चारही तळ उध्वस्त करण्यात आले होते.

याआधी सर्जिकल स्ट्राईकला जाताना आणि प्रत्यक्षात सर्जिकल स्ट्राईक करतानाचा थरारक अनुभव पुस्तकामध्ये कैद झाला होता. ‘इंडियाज मोस्ट फीयरलेस : ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिट्री हीरोज’ असे या पुस्तकाचे नाव आहे.