‘बेवफा ब्यूटी’ उर्मिला मातोंडकर परततेय 

सामना ऑनलाईन । मुंबई 
बॉलिवूडमधील एकेकाळची सेक्सी हिरोईन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून दूर राहिली आहे. दोन वर्षांपूर्वी लग्न बंधनात अडकलेली उर्मिला लाईमलाईटपासूनही तशी लांबंच राहिली. पण आता उर्मिला बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत असून लवकरच ती एका आयटम सॉंगमध्ये आपल्याला दिसणार आहे. इरफान खान याचा आगामी चित्रपट ब्लॅकमेलमध्ये उर्मिलाचे एक आयटम साँग आहे. उर्मिलाच्या पुनरागमनामुळे तिच्या चाहत्यांना आनंदच झाला आहे.

उर्मिलाने स्वत: इंस्टाग्रामवरून हे गाणे तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. बेवफा ब्यूटी इश्क में चिटींग कर गई असे बोल असलेल्या या गाण्यात उर्मिला थिरकताना दिसत आहे. ‘ बेवफा ब्यूटी इश्क में चिटींग कर गई, असे गाणे मी कधीच ऐकले नाही. या गाण्याचे शूटींग करताना खूप मज्जा आली.’ असे उर्मिलाने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे.
उर्मिलाने या आधी  राम गोपाल वर्मा याच्या ‘आग’ या चित्रपटात ‘मेहबूबा मेहबूबा’ आणि चायना गेट या चित्रपटात ‘छम्मा छम्मा’ हे आयटम साँग केले आहेत. तिचे हे दोन्ही आयटम साँग जबरदस्त हिट झाले होते.