अमेरिकेत अज्ञाताच्या गोळीबारात 13 ठार

2

सामना ऑनलाईन। कॅलिफोर्निया

अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियात बुधवारी रात्री एका बारमध्ये अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात 13 जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये हल्लेखोरासह एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. हल्लेखोराने स्वयंचलित बंदूकीतून बारमध्ये उपस्थित असलेल्यांवर बेछूट गोळीबार केला. दरम्यान या हल्ल्यात एकाहून अधिक जण सहभागी असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

बुधवारी रात्री येथील बॉर्डर लाईन बार अँड ग्रील पबमध्ये नेहमीप्रमाणेच लोकांची गर्दी होती. त्याचवेळी अचानक गर्दीतील एकाने लोकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी एकच गोंधळ उडाला. नागरिक जीव वाचवण्यासाठी वाट दिसेल तिथे धावत होती. या गोळीबाराचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यावरून पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.