उत्तर कोरियाचा प्रश्न हाताळण्यासाठी हिंदुस्थान मदत करू शकतो!: अमेरिका

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर कोरियाचा प्रश्न हाताळण्यासाठी हिंदुस्थान मदत करू शकतो, असे अमेरिकेच्या प्रशांत महासागर विभागाचे कमांडर (पॅसिफिक कमांडचे कमांडर) अॅडमिरल हॅरी हॅरिस म्हणाले.

उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्यानंतर अमेरिकेला अणुबॉम्बच्या हल्ल्याची धमकी दिली आहे. या धमकीमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी हिंदुस्थान मदत करू शकतो. अणुबॉम्बची हाताळणी या बाबतीत हिंदुस्थान अतिशय जबाबदारीने वागणारा देश आहे. अण्वस्त्रधारी देशाने तणावाचे प्रसंग कसे हाताळावेत हे हिंदुस्थानचा चांगले समजते. त्यामुळे हिंदुस्थानने उत्तर कोरियाशी चर्चा केल्यास तणाव कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास अॅडमिरल हॅरी हॅरिस यांनी व्यक्त केला. हिंदुस्थानच्या बोलण्याला जगात खूप किंमत आहे. सध्याच्या स्थितीत फक्त हिंदुस्थानच उत्तर कोरियाला अमेरिकेची चिंता समजावून सांगू शकतो असेही अॅडमिरल हॅरी हॅरिस म्हणाले.

उत्तर कोरिया मागील काही दिवसांपासून सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या करत आहे. शांततेला बाधा आणणारे कृत्य केल्याप्रकरणी अमेरिकेने उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहे. हे निर्बंध लागू झाल्यानंतर हिंदुस्थानने उत्तर कोरियासोबतचा थेट व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थान सरकारच्या या निर्णयाचे अमेरिकेने कौतुक केले होते.

डोकलाम आणि उत्तर कोरिया प्रश्न

डोकलामवरुन हिंदुस्थान-चीन यांच्यात तणावाचे वातावरण असतानाच क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत आहे. उत्तर कोरियावर हल्ला झाला तर चीन हल्लेखोराविरोधात युद्धात उतरेल अशी जाहीर भूमिका चीनने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाचा प्रश्न हाताळण्यासाठी अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने हिंदुस्थानला मदतीचे आवाहन केले आहे.

हिंदुस्थान एक परिपक्व देश

चीन आणि हिंदुस्थान यांच्यात डोकलामच्या निमित्ताने तणाव निर्माण झाला आहे. तणावाच्या या परिस्थितीत हिंदुस्थान ज्या पद्धतीने वागत आहे ते पाहता हा देश परिपक्व शक्तीच्या रुपात जगासमोर येत आहे. या उलट चीनची वागणूक एखाद्या बेजबाबदार तरुणासारखी असल्याचे अमेरिकेतील एका प्रख्यात संरक्षण तज्ज्ञाने सांगितले. अमेरिकेतील संरक्षण तज्ज्ञाचे मत आणि अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने केलेले वक्तव्य यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत नवे तर्कवितर्क सुरू झाले आहेत.