कर्नाटकच्या निवडणुकीत ‘फेक न्यूज’चा बोलबाला… अमेरिकन मीडियाचा दावा

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

कर्नाटक निवडणूकांचा निकाल लागला असून भाजपच मोठा पक्ष असल्याचे सिध्द झाले आहे. यामुळे भाजपच्या गोटात जल्लोष साजरा होत आहे. अशावेळी अमेरिकेच्या मीडियाने मात्र ही निवडणुक व्हॉट्सअॅप व फेसबुकवर खोट्या बातम्या पेरून लढवण्यात आल्याचा दावा केला आहे.

वॉशिंग्टन पोस्टने हा दावा केला आहे. त्यात आतापर्यंत निवडणुकांच्या प्रचारासाठी रॅली काढणे , वादविवाद करणं हे कालबाह्य झाल्याचे म्हटले आहे. ज्या अॅप्सचा वापर लोकं कॉल व चॅट करण्यासाठी करतात. त्या अॅप्सचा वापर हिंदुस्थानमध्ये आता निवडणुका लढवण्यासाठी केला जात आहे. असं राजकीय विशेषज्ञांच म्हणणं आहे असं वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. या महिन्यात कर्नाटकमध्ये हायप्रोफाईल निवडणुका झाल्या. या निवडणूका लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवरच लढल्या गेल्या. दोन बलाढ्य राजकीय पक्ष यासाठी आमने -सामने उभे राहीले होते. या पक्षांनी २०,००० हून अधिक व्हॉट्सअॅप ग्रुपतर्फे १५ लाख सर्मथकांपर्यंत पक्षाचा संदेश पोहचण्याचा दावा केला होता. पण या संदेशांमध्ये लोकांच्या धार्मिक भावना चिथावणारी वक्तव्य करण्यात आली. विरोधी पक्षाच्या विरोधात उन्मादात विधानं कऱण्यात आली. अनेक विधानांचा विपर्यास करुन त्याचा वापर करण्यात आला. तर काहीवेळा यात खोट्या विधानांचाही उपयोग करण्यात आला. यामुळे देशाच्या एकात्मतेलाच आवाहन मिळाले आणि हिंदू -मुस्लीम समाजात तणाव निर्माण झाल्याचे वॉश्गिंटन पोस्टने म्हटले आहे.

तसेच या निवडणुकांच्या आधीच व्हॉट्सअॅपचे स्वामीत्व असलेल्या फेसबुकवर हिंदुस्थानमध्ये लोकशाहीचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला होता. म्यानमार व श्रीलंका साऱख्या विकसनशिल देशांमध्ये फेसबुकमुळे दंगल भडकल्याचे, हत्या होण्याचे व धार्मिक वाद निर्माण करण्याचा आरोप आहे.असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आता या माध्यमाचा वापर विरोधकांना शिव्या घालण्यासाठी करण्यात येत आहे. हे लोकशाहीपुढे मोठे आव्हान आहे. हिंदुस्थानमध्ये अनेक जणांसाठी इंटरनेट नवीन असून त्याचा योग्य वापर करण्यासाठी ते सक्षम नसल्याचा ठपकाही वॉशिंग्टन पोस्टने ठेवला आहे.