डोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ


सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिकेतली आजची सकाळ एका सनसनाटी बातमीने उजाडली. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या पहिल्या पानावर ‘डोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा’ अशा छापलेल्या मुख्य बातमीने एकच खळबळ उडाली. वर्तमानपत्राच्या प्रती अक्षरशः मोफत वाटण्यात आल्या. अमेरिकेत सुरू असलेल्या शटडाऊनची चर्चा त्यामुळे आणखीनच रंगली. बातमीबरोबर ट्रम्प यांचा रागाने लालबुंद झालेला फोटोही दिसत होता. ही बातमी काही मिनिटांतच संपूर्ण अमेरिकेत आगीसारखी पसरली. पण ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या या प्रती बनावट असल्याचे स्वतः या वर्तमानपत्राने ट्विटरवरून जाहीर केले आणि ट्रम्प यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

ट्विटरवरून सांगितले सत्य
ही बातमी व्हायरल झाल्यानंतर ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने स्वतः सोशल मीडियावरून याबाबतची सत्यता सांगितली. खोटय़ा बातम्या पसरवणाऱया काही लोकांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बनावट प्रती छापून विकल्याचे सांगितले. काही वेबसाइटस् आमच्या वर्तमानपत्राची नक्कल करतात. अशा वेबसाइटस्बद्दल आम्हाला कळले आहे. त्यांच्याशी आमचा काहीच संबंध नाही. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असल्याचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने स्पष्ट केले.

डिझाईन आणि साईजचीही कॉपी
‘वॉशिंग्टन पोस्ट’चे डिझाईन आणि साईज हुबेहूब कॉपी करून या प्रती छापण्यात आल्या होत्या. या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मोठय़ा अक्षरात ‘अनप्रेसिडेंटेड म्हणजेच राष्ट्रपती पदावरून पायउतार’ असे लिहिले होते. ट्रम्प यांच्या घाईघाईत व्हाइट हाऊस सोडण्याबरोबरच आणीबाणीचाही अंत झाल्याची फोटोखाली कॅप्शनही देण्यात आली होती.

– ‘ट्रम्प यांचे पर्व संपले असून जगभरात उत्सवाचे वातावरण’ असे वर्तमानपत्राच्या डाव्या बाजूला लिहिले होते.
– तारीख मात्र 1 मे 2019 अशी चुकीची छापण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी या तारखेवरूनच हे वर्तमानपत्र बनावट असल्याचे पकडले.
– विशेष म्हणजे व्हाइट हाऊसच्या आजूबाजूलाच ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बनावट प्रती मोफत वाटण्यात आल्या.
– या बनावट प्रती असल्याचे उघड झाल्यानंतर एक महिला व्हाइट हाऊसजवळ ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बनावट प्रती वाटत असल्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला.